मुंबई - राज्यात सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळ सुद्धा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने काटकसरीचा मार्ग स्वीकारला असून इंधन बचतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 31 विभाग व 250 आगारांपैकी कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त अंतर कापून महामंडळाच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करणाऱ्या राज्यातील 5 विभाग व 5 आगाराने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन ऑइल कंपनीकडून चषक देऊन गौरविण्यात आले.
या आगराचा झाला गौरव-
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. एसटी वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या दरवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात महामंडळातील 31 विभागांपैकी भंडारा , वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली व जालना या 5 विभागांनी तसेच २५० आगारांपैकी भंडारा विभागातील साकोली , तिरोडा , गोंदिया व पवनी तसेच नागपूर विभागातील वर्धमान नगर अशा एकूण 5 आगारांनी कमीत कमी इंधनामध्ये सर्वाधिक अंतर कापण्याची उल्लेखनीय कामगिरी करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यास हातभार लावलेला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन ऑइल कंपनीकडून चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कर्मचाऱ्यांचे केले कौतुक -
एसटीच्या चालकांनी कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त अंतर कापल्यास कोट्यवधी रुपयांची बचत होऊन त्याचा महामंडळाला नक्कीच फायदा होईल , असा विश्वास अभियांत्रिकी विभागाचे महाव्यवस्थापक रघुनाथ कांबळे यांनी व्यक्त केला. तर डिझेलचा एक एक थेंब वाचवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणाऱ्या विभाग नियंत्रक तसेच आगार प्रमुखांचे बाबाजी कदम यांनी कौतुक केले.
प्रत्येक दिवशी एक कोटीचा तोटा-
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एसटी महामंडळाला मिळणाऱ्या डिझेलचे दर 65 रुपये लिटर होते. त्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारीमध्ये डिझेलचे दर एकूण 79 रुपये लिटर आहे. यामध्ये तब्बल 13 रुपयांची दरवाढ झाली असून त्याचा परिणाम एसटी महामंडळावर दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी सातत्याने वाढत असल्याने इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाला सुद्धा सहन करावा लागत असून दिवसाला एक कोटींचा तोटा होत आहे. महिन्याभरात तब्बल तीस कोटीचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागला आहे.