मुंबई - ऐन गणेशोत्सवात राज्यातल्या वीज कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात सरकारने भरघोस वाढ केली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या नव्या निर्णयामुळे राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या ३२.५० टक्के वेतनवाढ दिली जाणार आहे.
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या मूळ वेतनाच्या ३२.५० टक्के तर विविध भत्त्यांमध्ये १०० टक्के वाढ करण्यात येणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या प्रशासनासोबत तसेच विविध कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीमध्ये बावनकुळे यांनी ही वेतनवाढ जाहीर केली. या वेतनवाढीसाठी गेल्या महिन्यात कामगार संघटनांसोबत चर्चा झाली होती. मूळ वेतनामध्ये ३२.५० टक्के पगारवाढीसोबत महाराष्ट्र शासनाप्रमाणे १२५ टक्के महागाई भत्ता ही मूळ वेतनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या वेतन करारात तांत्रिक व अतांत्रिक सहायक प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना पहिल्या वर्षी १५ हजार, दुसऱ्या वर्षी १६ हजार तर तिसऱ्या वर्षी १७ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाशिवाय २० टक्के अतिरिक्त वाढ देण्यात येणार आहे. वर्ग ४ च्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये ५०० रुपये वाढ करण्यात आलेली आहे. कर्मचारी अपघात विमा योजना आणि ग्रुप टर्म विम्याची रक्कम १० लाखावरून २० लाखापर्यन्त करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांना मोबाईलद्वारे मीटर रिडींग घेण्याकरिता त्यांच्या वाहनाच्या वापराप्रमाणे पेट्रोल भत्ता देण्यात येणार आहे. या महत्वपुर्ण बैठकीस ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन ननोटीया, महाराष्ट्र वीज महामंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, संचालक (वित्त) जयकुमार श्रीनिवासन, संचालक (मानव संसाधन) ब्रिगेडियर पी.के. गंजू (सेवानिवृत्त) तसेच तिन्ही कंपन्यांचे कार्यकारी संचालक, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.