मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामन्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले होते. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे लाॅकडाऊनच्या नियमात शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या तब्बल 31 लाखांपर्यंत पोहचली आहे.
इंधन दर वाढीमुळे बेकायदेशीर प्रवास-
'ब्रेक द चेन' अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय सेवेतील, रुग्ण, दिव्यांग यांना लोकल प्रवासात परवानगी दिली आहे. मात्र,आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्याने अनेक नागरिक आता कार्यलय जाणे सुरु केले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगोदरच पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे कमी पगार असणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्च ही पेलवेना झाला आहे. कारण मुंबईत कामाला येणारे अनेक नागरिक कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून येतात. मात्र, इंधन दरवाढीमुळे रस्ते मार्गाने मुंबई गाठणे खिशाला परवडणारे नसल्याने आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने अनधिकृतपणे सर्वसामान्य प्रवासी लोकल प्रवास करत आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसात लोकलची प्रवासी संख्या वाढली आहे.
एसटीच्या बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल-
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद असल्यामुळे बेस्टच्या बसेस वर मोठ्या प्रमाणात ताण आलेला होता. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या तिन्ही विभागातून एसटी महामंडळाच्या 1 हजार बसेस बेस्टचा मदतीसाठी धावत होत्या. मात्र, आता या बसेस सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे खासगी आस्थापनांमधून कामकाज सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहेत. त्यामुळे नोकरी जाण्याचा भीती पोटी सर्वसामान्य नागरिकांना कामावर जावे लागत आहे आणि त्यामुळे बरेच सर्वसामान्य नागरिक नाईलाजास्त लोकलचा अनाधिकृत प्रवास करत आहे.
अशी वाढली प्रवासी संख्या-
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावरील 5 जून 2021 पर्यत 11 लाखांहून अधिक प्रवाशांनी लोकलमधून प्रवास केल्याची नोंद आहे. तर 10 जूनअखेर ही प्रवासी 12 लाख 50 हजारांपर्यंत पोहोचली. 15 जून अखेर अंदाजे 15 लाखांच्या आसपास प्रवासी संख्या आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील 5 जून अखेरपर्यत साडे नऊ लाख प्रवाशांनी लोकल प्रवास केला आहे. तर 10 जूनपर्यत 13 लाख तर 15 जूनला 16 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या 15 दिवसात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या तब्बल 31 लाखांपर्यंत पोहचली आहे.
हेही वाचा - ...आणि असा झाला ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’चा जन्म!