मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक तसेच सख्ख्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्या मालकीच्या संस्था तसेच कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई सुरू आहे. अजित पवार यांच्या बहिणीच्या पुणे आणि कोल्हापूर येथे असलेल्या संस्थांवर प्राप्तिकर विभागाने धाडी टाकल्या. तसेच अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांच्या मुंबईवरील कार्यालयावर सहाव्या दिवशीही आयकर विभागाने धाड टाकली आहे.
पार्थ पवार यांच्यासह 2 भागीदार
मुंबईतील नरिमन पॉइंट परिसरात असलेल्या निर्मल भवन या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीचे मालक पार्थ पवार असून या कंपनीवर प्राप्तिकर विभागाने धाड टाकली आहे. या कंपनीचे पार्थ पवार यांच्यासह अजूनही दोन भागीदार आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर - राष्ट्रवादी
राजकीय द्वेषापोटी केंद्रातील भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून पवार कुटुंबीयांमागे तपास यंत्रणेचा ससेमिरा लावण्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर केंद्रातील भारतीय जनता पार्टी विरोधकांना दाबण्यासाठी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.