मुंबई - बंगळुरू येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी याच मागणीसाठी ही मऱ्हाटी पोरे रस्त्यावर उतरली. या 38 पोरांवर आज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना (Samana Editorial On Shivaji statue in Bengaluru)कायमचेच सडवण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाकडे पोटतिडकीने पाहायला हवे. महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे? बेळगावच्या (7 arrested for defacing Shivaji statue in Bengaluru) तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व येथील सरकारने अंग चोरून बसायचे, हे बरे नाही. बेळगावातील 38 तरुणांच्या लढ्याने, त्यागाने रायगडास नक्कीच जाग आली असेल. पण रायगडाच्या पायथ्याशी बसलेल्या मऱ्हाटी, शिवप्रेमी सरकारचे मन द्रवेल काय? असा प्रश्न उपस्थित करत आजच्या सामनामध्ये भाजपसह कर्नाटक सरकाला सुनावण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील भाजपवाले त्या दडपशाहीवर 'ब्र' काढायला तयार नाहीत
भारतीय जनता पक्षाने आपली विश्वासार्हता साफ गमावली आहे. ठाम अशी भूमिका नाहीच. कधी कशी टोपी फिरवतील याचा नेम नाही. एकतर त्यांच्या भूमिका राज्याराज्यानुसार बदलत असतात. पण न्याय-अन्यायाच्या व्याख्याही बदलत असतात. या 'दहातोंडी'पणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बंगळुरूत झालेली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना. त्या विटंबनेनंतर कर्नाटक सरकारने सुरू केलेली दडपशाही हा धक्कादायक प्रकार आहे. प्रकरण शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे व विटंबनेचा धिक्कार करणाऱ्या मराठीजनांवरील अत्याचारांचे आहे. कर्नाटकात भाजपचे शासन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपवाले त्या दडपशाहीवर 'ब्र' काढायला तयार नाहीत. हे सर्व प्रकरण अद्याप विझलेले नाही, तर त्यात तेल ओतण्याचे काम कर्नाटकचे बोम्मई सरकार करत आहे.
या अतिरेकास काय म्हणायचे?
16 डिसेंबरला बंगळुरूत छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना अज्ञात समाजकंटकांनी केली आहे. हे अज्ञात समाजकंटक म्हणजे कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे गावगुंड होते. त्या घटनेचे पडसाद उमटायचे ते उमटलेच. सीमा भागातील मराठी जनतेने शिवराय पुतळा विटंबनेचा रस्त्यावर येऊन निषेध केला. हा लोकांचा संताप आणि चिड होती. बंगळुरू येथील शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कारवाई करावी याच मागणीसाठी ही मऱ्हाटी पोरे रस्त्यावर उतरली. तेव्हा त्यांना कानडी पोलिसांनी बेदम मारहाण करून तुरुंगात पाठवले. आजपर्यंत त्यांना जामीन तर मिळू दिलेला नाहीच, पण या 38 पोरांवर आज राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमचेच सडवण्याचा अघोरी प्रकार सुरू झाला आहे. या अतिरेकास काय म्हणायचे? ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनीच स्पष्ट करावे.
शिवरायांचा कर्नाटकात अपमान झाला त्याचे पडसाद महाराष्ट्रातही विविध ठिकाणी उमटले
शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध केला, हा काय देशद्रोहासारखा अपराध झाला? त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, शिवरायांचा अपमान ही किरकोळ बाब आहे. त्यासाठी अशी निषेधाची आंदोलने करणे बरे नाही. श्रीमान बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती व तुमचाही मियाँ बोम्मई खान बनला असता. शिवराय होते, जन्मले व मोगलांविरुद्ध लढले म्हणून तुमची ही आजची मिजास सुरू आहे. शिवरायांचा कर्नाटकात अपमान झाला त्याचे पडसाद महाराष्ट्रातही विविध ठिकाणी उमटले. म्हणून या सर्व लोकांवर महाराष्ट्र सरकारने देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले नाहीत. कारण महाराष्ट्राचे शिवराय प्रेम बावनकशी आहे, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते राज्यातील मऱ्हाटी रक्ताच्या भाजप पुढाऱ्यांचे. त्यांची बेळगावसह सीमा भागाविषयीची भूमिका ही बुळबुळीत आहे. ती गुळगुळीत असती तरी एकवेळ निभावले असते, पण सीमा भाग महाराष्ट्रात यावा म्हणून जे 20 लाख मराठी बांधव लढत आहेत, मरत आहेत त्यांचे पाय खेचण्याचेच उद्योग महाराष्ट्रात बसून हे लोक करीत आहेत. सीमा भागातील अत्याचाराविरोधात हे लोक कधी साधा कागदी निषेध करत नाहीत. पण इतर प्रकरणी नुसता थयथयाट करतात.
भाजप काळात ही अशी मोगलाई वाढत चालली आहे
सिंधुदुर्गातील गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सामील झालेल्या 'उपऱ्या' भाजप आमदारासाठी फडणवीसांसह संपूर्ण मऱ्हाटी भाजप महाराष्ट्र सरकारविरुद्ध छाती पिटत आहे. याद राखा, खून प्रकरणातील आरोपींना हात लावाल तर. राज्यात राष्ट्रपती शासन लावून घेईन अशा धमक्या ही मंडळी देत आहेत, गोपीचंद पडळकरांवर 14 गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. पण त्यांच्या सुरक्षेसाठी विधानसभेत भाजपने बॅण्ड वाजवून नाचायचेच काय ते बाकी ठेवले. पडळकरांवरील गुन्ह्यांची यादीच गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाईंनी वाचली. पण बेळगावातील भाजपचे बोम्मई सरकार 38 मऱ्हाटी तरुणांना नाहक देशद्रोहाच्या आरोपाखाली ठेचत आहे. त्यावर हे लोक बोलत नाहीत. शिवरायांचा अपमान भाजपच्या लेखी झालाच नाही. उलट बेळगावचे तरुण 'जय भवानी जय शिवाजीं'च्या घोषणा देत निषेध करू लागले हाच त्यांचा मोठा अपराध ठरला आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी काशीत जाऊन शिवरायांच्या शौर्याचे गुणगान करायचे व दुसरीकडे कर्नाटकातील त्यांच्याच राज्यात शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करणाऱ्या मराठी तरुणांना देशद्रोही ठरवून ठेचायचे. भाजप काळात ही अशी मोगलाई वाढत चालली आहे व त्यांची मोगलाई हिंदुत्वाचे नकली मुखवटे घालून फिरत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती तेथील मऱ्हाटी माणसांच्या न्याय्य हक्कासाठीच लढत आहे
मराठी तरुणांना देशद्रोही ठरविताना बोम्मई सरकारने आणखी एक अफझलखानी विडा उचलला आहे. तो म्हणजे सीमा भागातून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याचा. बोम्मई हे अफझलखानी कृत्य खरेच करणार असतील तर ती भाजपच्या नकली हिंदुत्वाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरावी. महाराष्ट्र एकीकरण समिती तेथील मऱ्हाटी माणसांच्या न्याय्य हक्कासाठीच लढत आहे. लोकशाही व राज्यघटनेने त्यांना तो अधिकार बहाल केला. सीमा प्रश्नाचा विषय सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. अयोध्येतील राममंदिराचा फैसला झाला, त्याप्रमाणे सीमा भागाचाही न्याय एक दिवस होईल, या आशेवर सीमा भागातील मराठी लोक जगत आहेत. त्यांच्या आशेला चूड लावण्याचे पाप कोणी करणार असेल तर त्या क्षणीच शिवसेना विजेचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे बेळगावात प्रकटेल व संपूर्ण कर्नाटकात घोडदौड करेल. म्हणूनच आम्ही सांगतो, शिवरायांचे पाईक असलेल्या 38 मराठी तरुणांची सुटका करा. त्यांना देशद्रोहाची कलमे लावाल तर तुम्ही औरंगजेबाच्या अवलादीचे!
बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व येथील सरकारने अंग चोरून बसायचे
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाकडे गांभीर्याने, तितक्याच पोटतिडकीने पाहायला हवे. विधिमंडळात एकमेकांवर शालजोडे मारण्यापेक्षा शिवरायांसाठी देशद्रोही ठरवल्या गेलेल्या त्या 38 तरुणांसाठी एकत्रितपणे काय करता येईल ते पाहायला हवे. महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे? त्या 38 मराठी तरुणांच्या कायदेशीर लढ्यासाठी थोडे अर्थार्जन व वकिलांची व्यवस्था तरी महाराष्ट्र सरकारने करायलाच हवी होती. बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व येथील सरकारने अंग चोरून बसायचे, हे बरे नाही. बेळगावातील 38 तरुणांच्या लढ्याने, त्यागाने रायगडास नक्कीच जाग आली असेल. पण रायगडाच्या पायथ्याशी बसलेल्या मऱ्हाटी, शिवप्रेमी सरकारचे मन द्रवेल काय? शिवरायांसाठी राजद्रोही ठरवले गेलेले ते 38 तरुण फासावर जाण्याचीच आपण वाट पाहणार काय?
हेही वाचा - Home Minister On New Year : नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर नियम पाळा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील