मुंबई - शहरी नक्षलवादाप्रकरणी अटक असलेल्या १५ आरोपींवरील आरोप निश्चितीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी दहशतवादासारख्या गंभीर आरोपांसह १७ आरोपांचा मसुदा विशेष न्यायालयात सादर केला आहे. या मसुद्यावर विशेष न्यायालय २३ ऑगस्टला सुनावणी करणार असून त्यानंतर आरोप निश्चिती प्रक्रिया होईल.
गंभीर आरोपांसह विविध कलमांअतर्गत आरोपांचा समावेश
या प्रकरणी मानवाधिकार हक्कांसाठी लढणाऱ्या सुधा भारद्वाज, वेर्णन गोन्साल्विस, वरवरा राव, हानी बाबू, प्रा. आनंद तेलतुंबडे, शोमा सेन, गौतम नवलखा यांच्यासह १५ जण अटकेत आहेत. त्यांच्याविरोधात एनआयएने आरोपांचा मसुदा सादर केला आहे. त्यात बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) दहशतवादाच्या गंभीर आरोपांसह विविध कलमांअतर्गत आरोपांचा समावेश आहे.
17 आरोपांची यादी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टापुढे सादर
आरोपनिश्चितीनंतर खटल्याला सुरुवात होते. आरोप निश्चितीपूर्वी आरोपींनी केलेल्या विविध अर्जांवर सुनावणी घेऊन ते निकाली काढण्याची मागणी आरोपींच्या वकिलांतर्फे करण्यात आली आहे. त्यावर आरोपींनी केलेल्या सगळ्या अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने एनआयएला दिले आहेत. तसेच, सुनावणीच्यावेळी या अर्जांवर सर्व आरोपींचा युक्तिवाद ऐकला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहरी नक्षलवाद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने आरोपींविरोधात 17 आरोपांची यादी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टापुढे सादर केली आहे. याप्रकरणी एकूण 15 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, पाचजण फरार आहेत. तर स्टेन स्वामी यांचा मृत्यू झाला आहे.
कट रचून भारताची सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात
दरम्यान, एल्गार परिषद प्रकरणी 22 आरोपींविरुद्ध न्यायालयात दाखल केलेल्या आरोप पत्राच्या मसुद्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हटले आहे की, यातील आरोपींनी "सरकारी किंवा नागरी अधिकारी/सार्वजनिक अधिकारी" यांच्याविरुद्ध कट रचून भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात आणली आहे.