मुंबई - शाळा केव्हा सुरु करायच्या. शिक्षकांना शाळेत केव्हा बोलवायचे, याबाबतचा शिक्षण विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यात दिनांक ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून अनेक शाळांनी मात्र शिक्षकांना शाळेत बोलावण्याचे फर्मान काढले आहे.
अद्याप कोणताही निर्णय नाही -
याबाबत शिक्षण विभागाने शिक्षकांना शाळेत बोलावण्याबाबत कोणतेही आदेश काढलेले नसतांना शिक्षकांना शाळेत कशासाठी बोलावले? असा प्रश्न विचारीत भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे याबाबत शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करणार आहेत. मुंबईतील शाळा सुरू झाल्याची घोषणा झाल्यावर शिक्षक २ दिवस आधी तयारीसाठी शाळेत येतील. मात्र शाळा सुरू करण्याबाबत आयुक्तांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून तो पर्यंत शिक्षक ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवतील असे बोरनारे यांनी सांगितले.
हेही वाचा : हिवरेबाजारमध्ये शाळा सुरू होऊन 100 दिवस पूर्ण; पालकासंह विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव साजरा
आयुक्तांकडी प्रस्ताव -
मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत मुंबई मनपा आयुक्तांना अधिकार दिले आहेत. मुंबई मनपा शिक्षण अधिकारी मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करतील, त्यावर आयुक्त कोणता निर्णय घेतात याकडे मुंबईतील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले असून बहुतेक आयुक्त मुंबईतील शाळा दिवाळीनंतर सुरू करण्याला हिरवा कंदील देतील असा शिक्षणक्षेत्रात अंदाज बांधला जात आहे