मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओत स्फोटक व धमकीचे पत्र ठेवल्याची कबुली सचिन वाझे याने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिल्यानंतर यात आणखीन एक खुलासा करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी अँटिलिया या इमारतीच्या बाहेर स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती. स्कॉर्पिओ मागे जी ईनोव्हा होती, त्यामध्ये सचिन वाझे होता. जिलेटीन कांड्या असलेली स्कॉर्पिओ अँटिलिया बाहेर पार्क केल्यानंतर गाडीमध्ये धमकीचे पत्र ठेवण्याचे सचिन वाझे विसरला होता. काही अंतर पुढे गेल्यानंतर परत मागे फिरून वाझेने धमकीचे पत्र स्कॉर्पिओ गाडीत ठेवले होते.
अँटिलियाबाहेरील सीसीटीव्हीत वाझे कैद
धमकीचे पत्र स्कॉर्पिओत ठेवल्यानंतर सचिन वाझे हा काही अंतर रस्त्यावरून चालत ईनोव्हाकडे गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. सचिन वाझेने तेव्हा अंगावर पीपीई किटसारखे वस्त्र परिधान केले होते. अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये वाझे दिसून आलेला आहे.
सचिन वाझेने विनायक शिंदेला दिले होते 50 हजार रुपये
मुंबईत 2007 मध्ये झालेल्या लखनभैया बनावट एन्काउंटर प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेला विनायक शिंदे कोरोना संक्रमणामुळे पॅरोलवर बाहेर आलेला होता. एक वर्षासाठी बाहेर आलेला शिंदे सचिन वाझेच्या संपर्कात आला होता. बनावट सीमकार्ड मिळवण्यासाठी वाझेने काही क्रिकेट बुकींना संपर्क केला होता. क्रिकेट बुकीकडून बनावट सीमकार्ड घेण्याचे काम वाझेने शिंदेला दिले होते. यासाठी त्याला 50 हजार रुपये दिल्याचे वाझेने 'एनआयए'च्या चौकशीत सांगितल्याचे समोर आले आहे.
एनआयएने स्कॉर्पिओ, इनोव्हा यासह वाझे वापरत असलेल्या तीन आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. याबरोबरच आणखी 2 गाड्यांचा शोध राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून घेतला जात आहे. या गाड्या सचिन वाझे वापरत असल्याचं चौकशीअंती समोर आले आहे. तर एटीएसकडून सुद्धा एक वाहन जप्त करण्यात आले आहे.