मुंबई : मुंबईत रात्रभर मुसळधार पावसानंतर ( Torrential Rains in Mumbai ) सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नागरिकांच्या अडचणीत वाढ केली आहे. सोमवारी रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या वेगालाही ब्रेक लागला ( Facing Transportation Problems in Mumbai ) असून, नागरिकांना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याच वेळी, भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मते, महानगरांना पावसापासून अद्यापि दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. आयएमडीने आजही शहरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ( IMD has Forecast Moderate to Heavy Rains in Maharastra )
आणखी 3 ते 4 दिवस मुसळधार : हवामान विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत मंगळवारी मुसळधार पावसादरम्यान मरिन ड्राईव्हवरही उधाणाची भरती-ओहोटी दिसून आली. आयएमडीने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुण्यातील घाट भागात आणि सातारा, नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत पुढील आणखी तीन ते चार दिवस काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
गरज असेल तरच बाहेर पडा : येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि गोव्याच्या किनारपट्टीलगतच्या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. प्रशासनाने लोकांना आवाहन केले की, जर अत्यंत महत्त्वाचे असेल, तरच घराबाहेर पडा. गरज असेल तर वैयक्तिक वाहने बाहेर काढा किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
चौपाटी परिसरात जीवनरक्षक तैनात : ओडिशातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्रातदेखील उंच लाटा उठण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. चौपाटीवर जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. झाड पडण्याच्या घटनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अग्निशमन दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मुंबईत गेल्या ४८ तासांत आतापर्यंत १० झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत.
मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी : मुंबईत मंगळवारपासून गुरुवारपर्यंत तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबईत रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
नागरिकांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन : मुंबईत काल १३ जुलै सकाळी ८ ते आज १४ जुलै सकाळी ८ या २४ तासांत शहर विभागात ८८.७८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई पूर्व उपनगरात ९६.२०, तर पश्चिम उपनगरात ७९.१७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी १२.३३ वाजता ४.८२ तर १५ जुलैला मध्यरात्री १२.३८ वाजता ४.२२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
वेगवान वारे वाहणार : मुंबईत मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या कालावधीत मुंबईत मुसळधार पाऊस पडेल. तसेच ताशी ४५ ते ५५ किंवा ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
हेही वाचा : Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळित, शाळांना सुट्टी
हेही वाचा : वसई दरड दुर्घटना: मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 6 लाखाची मदत
हेही वाचा : BMC App : फुटपाथच्या समस्सेसाठी पालिकेचे ॲप, नागरिकांचा सहभाग घेणार