मुंबई - जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे आणि त्यासाठीचे नियोजन अडचणीत सापडले आहेत. आत्तापर्यंत काही शैक्षणिक अभ्यासक्रमांचे प्रवेश झाले आहे. तर काही अभ्यासक्रमांचे प्रवेश लांबणीवर पडले आहे. शिवाय परीक्षांचा ताणही सुरू आहे. अशा प्रकारच्या विविध प्रश्नांनी ग्रासलेल्या विद्यार्थ्याना मानसिक पाठबळ देण्यासाठी आयआयटी मुंबईने 'बंधू' नावाचे एक संकेतस्थळ सुरू केले आहे.
जगभरात कोरोनाचे संकट कायम आहे. अनेक विद्यार्थी आयआयटी आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांच्यापैकी असंख्य विद्यार्थी घरात बंद आहे. तर काही विद्यार्थी आयआयटी मुंबईसह देशातील इतर आयआयटीच्या संकुलात पोहोचले आहेत. या कठीण परिस्थितीत विद्यार्थी मोठ्याप्रमाणत चिंतेच्या वातावरणात अभ्यास करत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाने आपले डोके वर काढले असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विविध प्रकारच्या प्रश्नांनी विद्यार्थी ग्रासले असल्याने त्यातून त्यांची सोडवून व्हावी आणि त्यांना मानसिक पाठबळ मिळावे यासाठी आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी 'बंधू' या नावाचे एक संकेतस्थळ सुरु केले आहे.
'बंधू' ची रचना -
आयआयटी मुंबईच्या १९९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सेल्फ हेल्प वेबसाइट तयार केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी या 'बंधू' आयआयटी मुंबईने सुरू केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संकटाच्या आणि आपल्या मनावर आलेला ताण, कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी कोणते पाऊल उचलावे, जीवनात यशस्वी कसे व्हावे यासंदर्भात मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी आपली सोडवणूक करावी, अशी रचना यात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या यशोगाथा देणार आधार -
'बंधू' या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती कशी कमी करावी ?, नापास होण्याची भीती ? वसतिगृहातील जीवन, विद्यार्थ्यांना होणारे भेदभाव, मित्रांकडून होणारा त्रास, इंटरनेटचे व्यसन अशा विविध समस्यांना सामोरे कसे जावे आणि त्यावरील उपाय सूचविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील नकारात्म्क भावना कमी होऊन त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
हे संकेतस्थळ नव संजीवनी ठरेल -
विद्यार्थ्यांना नकारात्मक विचारातून सकारात्मक विचारांकडे घेऊन जाण्यासाठी 'बंधू' हे संकेतस्थळ महत्वाचे ठरेल, असा विश्वास चित्रपट निर्माते आणि माजी विद्यार्थी नितेश तिवारी व्यक्त केला. ते म्हणाले की, विद्यार्थी जीवनात स्वतःला स्वतःची मदत करावी लागते आणि अशा काळात विद्यार्थ्यांना 'बंधू' संकेतस्थळ एक नव संजीवनी ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.