मुंबई - महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला सध्या केंद्रीय तपास यंत्रणांची डोकेदुखी सतावत आहे. मोदी व केंद्र सरकार महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट करत आहे, असा आरोप लावला जात आहे. दरम्यान, आरोप झालेले हे नेते केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य का करत नाहीत? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दुसऱ्यांदा ईडी'ने समन्स बजावून चौकशीला गैरहजर
शिवसेना खासदार भावना गवळी या आज दुसऱ्यांदा ईडी चौकशीला सामोरे गेल्या नाहीत. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप व शेल कंपन्याद्वारे कोट्यावधीच्या देणग्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अगोदर भावना गवळी यांना चार ऑक्टोबरला ईडी चौकशीला हजार राहण्यासाठी समन्स बजावले होते. परंतु, त्यांनी पंधरा दिवसांची मुदत मागितल्याने 20 तारखेला त्यांना दुसऱ्यांदा ईडी'ने समन्स बजावून चौकशीला हजर राहायला सांगितले होते. परंतु, गवळी यांना चिकनगुनिया झाला असल्याने त्या चौकशीला हजर होऊ शकत नाहीत म्हणून त्यांना अजून पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी अशी माहिती त्यांचे वकील इन्द्रपाल सिंग यांनी ईडीला दिली आहे.
'कर नाही त्याला डर कशाला'
महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. तर, दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे आरोप करत असून या आरोपात काहीच तथ्य नसल्याचे सांगत हात झटकण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेते करत आहेत. किरीट सोमय्या यांच्याकडे आता कुठलंच काम नसल्याने ते फक्त चौकशी करण्याचा ससेमिरा नेत्यांच्या मागे लावण्याचे काम करत आहेत असे वारंवार महाविकास आघाडी सरकारमधील नेत्याने स्पष्ट केले आहे. मग 'कर नाही त्याला डर कशाला' या उक्तीप्रमाणे जर त्यांनी भ्रष्टाचाराची कामं केली नसतील तर त्यांनी चौकशीला सामोरे जायला काय हरकत आहे? असही दरेकर म्हणाले आहेत.
हेही अनेकदा चौकशीला राहिले गैरहजर
खासदार भावना गवळीच नाहीत, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा ईडी चौकशीला वारंवार गैरहजर राहत आले आहेत. पुण्यातील भोसले भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसेही बऱ्याचदा चौकशीला गैरहजर राहिले आहेत.
हेही वाचा - जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रक्षा खडसेंसह स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद