मुंबई - काल लोकसभेत स्वतंत्र विदर्भ होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना, असा कुठलाही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असे सांगून केंद्र सरकारने या मुद्द्यावर पडदा पाडला आहे. परंतु यासाठी महाराष्ट्र राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला हवा, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वारंवार केली जाते. मागील काही दशकांपासून ही मागणी सातत्याने सुरू आहे. या वेगळ्या राज्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील नेत्यांनी याबाबत कित्येकदा आग्रहही धरला होता. परंतु आता महा विकास आघाडी सरकारमध्ये शिवसेने सोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या विषयावर चुपी चुप्पी साधल्याचे भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र सरकारकडून तसा प्रस्ताव केंद्राला नाही -
वेगळा विदर्भ हे वेगळं राज्य होणार का? यासंदर्भातच काल केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्र सोडून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने काही पाऊल उचलले आहे का? किंवा असे राज्य करण्याचा काही प्रस्ताव आहे का?, असा प्रश्न भाजप खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत विचारला होता.
यावर उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भासंदर्भातील कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही, असं स्पष्टीकरण लोकसभेमध्ये सरकारकडून देण्यात आले.
'विदर्भासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा द्यावा' -
वेगळा विदर्भ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा लागतो असा नियम आहे. परंतु मागील कित्येक वर्षांपासून फक्त वेगळ्या विदर्भावर नारेबाजी करायची व दुसरीकडे सत्तेचा उपभोग घ्यायचा, असा प्रकार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आले आहेत, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी लावला आहे. वास्तविक आत्तासुद्धा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिला तर वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाऊ शकतो, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल आहे.
हेही वाचा - Omicron New Variant : देशाबाहेरून २८६८ प्रवासी मुंबईत दाखल, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह