मुंबई - मुंबईत मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आहे. तरीही नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास मुंबईत फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे अनलॉक करता येणे शक्य असल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.
कॉन्फड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांनी 'हेल्थकेअर काँन्फरन्स' आयोजित केली होती. यावेळी 'साथ नियंत्रण आणि त्यामधून बाहेर पडण्याचे मार्ग' या विषयावर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल बोलत होते. महापालिकेने दुकाने, कार्यालये, मॉल आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली आहे. पुढच्या टप्प्यात धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली जाईल. मात्र शहर पूर्णपणे अनलॉक करायचे असल्यास नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास आणि नियम पाळल्यास फेब्रुवारीपर्यंत पूर्ण शहर अनलॉक करता येऊ शकते, असे चहल म्हणाले.
सध्या मुंबईतील पश्चिम उपनगरात कोरोनाचा प्रसार होत आहे. या ठिकाणी मी भेट दिली असता नागरिक मास्क न लावताच रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आले. गेल्या 45 दिवसांत कोरोनाच्या परिस्थितीत बदल दिसत आहे. 80 टक्के रुग्ण झोपडपट्टी विभाग नसलेल्या विभागातून, विशेष इमारातीमधून आढळून येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पालिकेने रुग्णांसाठी जम्बो कोव्हीड सेंटर उभारली आहेत, त्यात खासगी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टर टेलिफोन आणि भेटी देऊन उपचार करत असल्याचे आयुक्त म्हणाले.
चहल यांना पुरस्कार
कोरोना काळात मुंबईतील चांगल्या कामगिरीविषयी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.