मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वांना इशारा देण्यात आला होता. मग हा इशारा गांभीर्याने घेत ओएनजीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना बार्जवरुन परत का नाही आणले? असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. या वादळामुळे 'बार्ज पी३०५'वरील ३७ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
बार्जवरील १८८ जणांना वाचवण्यात यश..
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबईच्या किनाऱ्यात असणाऱ्या बार्ज पी३०५ वरील कर्मचारी धोक्यात आले होते. ही बार्ज बु़डू लागल्यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या मारल्या होत्या. सध्या नौदल आणि तटरक्षक दलाकडून बचावकार्य सुरू असून, आतापर्यंत २६१ पैकी १८८ जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. मात्र, या दुर्घटनेला ओएनजीसीच जबाबदार असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला कंपनी जबाबदार..
नवाब मलिकांनी एकापाठोपाठ चार ट्विट करत हा आरोप केला आहे. तौक्ते चक्रीवादळाचा इशारा सर्वांनाच देण्यात आला होता. मच्छिमार नौकांना समुद्रातून बाहेर बोलावण्यात आले होते. मग हा इशारा ओएनजीसीने का गांभीर्याने नाही घेतला? त्यांनी वादळ जवळ येण्यापूर्वीच सर्व कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावर आणायला हवे होते. त्यांनी असे न केल्यामुळे जवळपास ६०० कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आले होते. यांपैकी ६० अजूनही बेपत्ता आहेत, असे मलिक म्हणाले.
कारवाईची केली मागणी..
याबाबत वेळीच योग्य निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या दुर्घटनेसाठी त्या अधिकाऱ्यांनाच जबाबदार ठरवून त्यांना योग्य ती शिक्षा देण्यात यावी. तसेच, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयालाही यात जबाबदार धरण्यात यावे; अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
हेही वाचा : 'बार्ज पी३०५' वरील ३७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले; १८८ जणांना वाचवण्यात यश, बचावकार्य सुरुच..