मुंबई - मुंबईकरांचा रविवार तणावमुक्त करण्याच्या हेतूने मागच्या रविवारपासून संडे स्ट्रीट ( Husbands join Sunday street Mumbai ) ही संकल्पना मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आणली. या संकल्पनेचे मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत होत आहे. परंतु, मागच्या रविवारी फक्त घरातील महिला व मुले हे मोठ्या प्रमाणात संडे स्ट्रीट निमित्ताने मुंबईच्या रस्त्यांवर दिसली. परंतु, या रविवारी त्यांच्या नावरोबांनाही आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्यावा, असं वाटल्याने ते ही रस्त्यावर उतरून याचा आनंद घेताना दिसले.
हेही वाचा - Summons to Praveen Darekar : मुंबई बँक फसवणूक प्रकरणी दरेकरांना चौकशीचे समन्स
पूर्ण कुटुंबासोबत मज्जाच न्यारी : मुंबईतील ठराविक रस्ते सकाळी ६ ते १० या वेळेत मोकळे ठेवण्यात आल्याने मुंबईकरांसाठी आता संडे स्पेशल झालेला आहे. या निमित्ताने मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकर सहकुटुंब आनंद घेताना दिसत आहेत. कोणी योगासने करत आहे, कोणी धावताना, कोणी सायकल चालवताना, कोणी स्केटिंग करताना, कोणी बॅटबॉल खेळताना, तर काहीजण फुटबॉल खेळताना दिसून आले.
विशेष म्हणजे, मागच्या आठवड्यामध्ये पहिल्या संडे स्ट्रीटला दिसणाऱ्या प्रतिसादा पेक्षा जास्त प्रतिसाद या रविवारी दिसून आला. कारण पूर्णच्या पूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊन संडे सकाळचा आनंद घेत होते. विशेष म्हणजे, या प्रसंगी बोलताना वसुंधरा या महिलेने असे सांगितले की, मागच्या रविवारी त्यांचे पती त्यांच्यासोबत आले नव्हते. ऑफिसला एकच दिवस सुट्टी भेटते. त्यात रविवारची सकाळ झोपून राहण्यात काहींना आनंद असतो. परंतु, मागच्या रविवारी नवऱ्याशिवाय त्यांनी जी मज्जा केली ती त्यांना सांगितल्यानंतर आज ते सुद्धा त्यांच्यासोबत रविवार सकाळचा आनंद घेण्यासाठी रस्त्यावर आले व पतीसोबत इथे आल्याने आज त्यांचा आनंद अधिक वाढला.
या रविवारी नऊ ठिकाणचे रस्ते मोकळे : संडे स्ट्रीटला भेटणारा वाढता प्रतिसाद बघता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी यामध्ये आणखी तीन रस्त्यांची भर घातली आहे. चेंबूर, एम.एच.बी. कॉलनी आणि समता नगर येथील रस्ते सुद्धा आज मोकळे करण्यात आले होते. या अगोदर मागच्या रविवारी मरीन ड्राइव्ह, वांद्रे, गोरेगाव, डी.एन. नगर, मुलुंड, विक्रोली येथील सहा ठिकाणचे रस्ते मोकळे झाले होते. आता अजून तीन ठिकाणचे रस्ते मोकळे झाले असल्याने एकंदरीत नऊ ठिकाणी मुंबईकरांना संडे स्ट्रीटचा आनंद घेता येणार आहे. त्याचबरोबर, येणाऱ्या दिवसांत संडे स्ट्रीटला भेटणारा वाढता प्रतिसाद बघता अजूनही काही ठिकाणचे रस्ते मोकळे केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - शिवतीर्थावरचा कालचा भोंगा हा भारतीय जनता पक्षाचा होता - खासदार संजय राऊत