मुंबई - वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलावात शनिवारी सकाळी शेकडो मासे मृतावस्थेत आढळले. येथील स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पितृ पक्ष श्राद्धानिमित्त धार्मिक विधी करताना तलावाच्या पाण्यात टाकलेले अन्न आणि इतर वस्तू यामुळे तलावातील माशांचा मृत्यू झाला असावा. शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पालिकेने दुपारी हा तलाव स्वच्छ केला आहे.
![Hundreds of fish die in Banganga lake](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-fish-dead-7205149_09102021232333_0910f_1633802013_121.jpg)
शेकडो माशांचा मृत्यू -
वाळकेश्वर येथे ऐतिहासिक बाणगंगा तलाव आहे. या तलावात ५ किलो वजनाचे मोठे तसेच इतर शेकडो मासे आहेत. या तलावाच्या काठावर पितृपक्ष श्राद्ध आदी धार्मिक कार्यक्रम केले जातात. यावेळी अनेक भक्त तलावाच्या पाण्यात धार्मिक विधीसाठी वापरलेले पीठ, तेल, हळद इत्यादी अर्पण करतात. पाण्यात टाकण्यात आलेले पीठ, तेल, हळद माशांनी खाल्ले असावेत यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. बाणगंगा तलाव नेहमी काठोकाठ भरलेला असतो. मात्र आज सकाळी पाण्याची पातळी टाकीच्या १० ते १२ पायऱ्या खाली गेली. तसेच, अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी झडप उघडे होते. तलावातील पाणी कमी झाल्यामुळे पाण्यातील माशांना ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला असावा, तसेच हे देखील शक्य आहे की मासे सूर्याच्या उष्णतेमुळे मरण पावले असावेत, असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिकाने सांगितले.
![Hundreds of fish die in Banganga lake](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-fish-dead-7205149_09102021232333_0910f_1633802013_938.jpg)
हेही वाचा : परमबीर सिंह यांना 12 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत गुन्हे शाखेने बजावली नोटीस