मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, काही कारणास्तव आज सुनावणी होऊ शकली नसल्याने आता या याचिकेवर 8 जून रोजी सुनावणी होणार आहे. मनी लाँन्ड्रिगप्रकरणी त्यांच्यावर ईडी आरोप केला आहे. न्यायालयाने हृषिकेश देशमुख यांना 27 मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
हृषिकेशचा गुन्ह्यात असलेला सहभाग : हृषिकेश याचा आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग होता आणि त्याने वडिलांना बेकायदा कमावलेली रक्कम देणगी म्हणून दाखवण्यास मदत केली होती, असा दावा ईडी विशेष न्यायालयात केला आहे. आतापर्यंतच्या तपासात देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली 11 कंपन्या असल्याचे उघड झाले आहे. त्यातील बहुतांशी कंपन्यांमध्ये हृषिकेश संचालक किंवा समभागधारक आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या माध्यमातून मुंबईतील बार व रेस्टॉरंट मालकांकडून वसूल केलेली 4.70 कोटी रुपयांची रक्कम हृषिकेशने वडिलांसोबत हवालामार्फत वळवली, असाही दावा ईडीने केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून 100 कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करीत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. ईडीच्या अटकेची कारवाई टाळण्यासाठी देशमुख यांनी मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण, कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आणि चौकशीअंती अटकेची कारवाई झाली.