मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. गेल्या दीड वर्षात भारतात कोरोना, डेल्टा आणि डेल्टा प्लस या विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून कोरोना रुग्णांचे दर आठवड्याला काही सॅंपल पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच एनआयव्हीकडे जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवले जातात. एनआयव्हीकडून या सॅम्पलचा अभ्यास करून नेमक्या कोणत्या विषाणूची लागण किती प्रमाणात झाली आहे याची माहिती मिळते. यामुळे संबंधित जिल्ह्यात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत याचा निर्णय घेतला जातो, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या काळात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढणार असल्याची माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिली.
- विषाणूमध्ये बदल -
राज्यात दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान विषाणूने आपले रूप अनेक वेळा बदलले आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी होत असतानाच ऑक्टोबर महिन्यात कोरोना विषाणूमध्ये बदल दिसून आला. डेल्टा विषाणूमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. आता पुन्हा राज्यात विषाणूमध्ये बदल दिसून आला आहे. विषाणूत पुन्हा एकदा बदल झाला आहे. याला डबल म्युटंट असे बोलले जाते. त्याला डेल्टा प्लस असे नाव देण्यात आले आहे. राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी रत्नागिरी मधील एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य विभाग अलर्ट झाला असून राज्यातील निर्बंध कडक केले आहेत.
- रिपोर्टसाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी -
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी दर आठवड्याला ५० रुग्णांचे सॅम्पल जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजेच एनआयव्हीकडे पाठवले जातात. यामधून त्या जिल्ह्यात किंवा त्या शहरात कोणत्या प्रकारच्या विषाणूचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत याची माहिती समोर येते. हा रिपोर्ट सुमारे एक ते दीड महिन्यांनी संबंधित सरकारी यंत्रणांना सादर केला जातो. हा रिपोर्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही सादर केला जातो.
- काय आहे जिनोमिक सिक्वेनसिंग -
मुंबईत जे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत त्यापैकी विविध विभागातील ५० रुग्णांचे सॅम्पल पुण्याच्या नॅशनल वायरॉलॉजी इन्स्टिट्यूटकडे जीनोम सिक्वेन्ससाठी पाठवले जातात. या सॅम्पलचा अहवाल एक ते दीड महिन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारला पाठवला जातो. या चाचणीच्या अहवालामधून विषाणूमध्ये बदल झाला आहे का ? म्हणजेच त्याचे म्युटेशन झाले आहे का याची माहिती तसेच रुग्णाला कोणत्या प्रकारच्या कोरोनाची लागण झाली आहे. शहरात ही लागण इतरही रुग्णांना झाली आहे का याची माहिती मिळते त्यावरून उपाययोजना करण्यात येतात अशी माहिती मुंबई महापालिकेच अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
- आरोग्य विभाग अलर्टवर -
- राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत. या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- काय आहे डेल्टा व्हेरियंट -
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथम नोंदवलेला डेल्टा प्रकार हा पूर्वीपेक्षा अपेक्षेपेक्षा अधिक वेगवान होता आणि एम्समध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, 2021 मध्ये हाच व्हेरियंट देशातील दुसर्या लाटेचे कारण ठरला होते. सुरुवातीच्या काळात चीनमधून हा विषाणू भारतात आला आहे आणि सध्या देशभरात या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. डेल्टा हा करोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. त्यामुळे पूर्वी जी लक्षणे सहा ते सात दिवसांनी दिसायची, ती आता संसर्ग झाल्यानंतर लवकर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ न दवडता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास लक्षणांची तीव्रता वाढणार नाही. डेल्टा विषाणू हा अधिक संसर्ग कारक आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये चटकन पसरतो. तो आधीच्या स्ट्रेनपेक्षा शरीरात लवकर पसरतो. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसांत दिसू लागतात. या स्ट्रेनचा संसर्ग झाल्यास औषधोपचार हे करोनाच्या उपचारपद्धतीसारखेच आहेत. मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दीत न जाणे ही त्रिसूत्री पाळणे गरजेचे आहे.
- डेल्टा प्लस व्हेरियंट -
नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. N501Y मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये K417Nचे उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते की, या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सांगतात, कोव्हिड-19 हा RNA व्हायरस आहे. त्यामुळे व्हारस म्युटेट होण्याची शक्यता खूप जास्त असते. "डेल्टा व्हेरियंटमध्ये आणखी म्युटेशन झाल्यामुळे, नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला. 'डेल्टा प्लस' व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. त्यासोबत स्पाईक प्रोटीममध्ये झालेलं K417N म्युटेशनदेखील आढळून आले आहे, अशी माहिती तज्ञांनी दिली.