मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Day) लाखो आंबेडकर अनुयायी देशभरातून चैत्यभूमी येथे दाखल होतात. दोन दिवस आगोदरच या वास्तूजवळ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येऊ लागतात. बाबासाहेब यांना मानणारा प्रत्येक व्यक्ती मग तो कोणत्याही जातीचा असो, तो या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. ६ डिसेंबरच्या (6 December Mahaparinirvan Day) रात्रीपर्यंत तसेच वातावरण असते.
नेमकं ही वास्तू कशी तयार झाली? -
सहा डिसेंबरच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे दाखल होतात. मात्र, ही वास्तू उभी राहण्यासाठी बाबासाहेबांचे पुत्र यशवंत यांनी विशेष मेहनत घेतली. बाबासाहेब गेल्याची दुःखद बातमी मिळाल्यानंतर माई साहेबांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मात्र, पुरेसे पैसे नसल्यामुळे समस्या कायम होती. त्यावेळी मंत्री असलेले बाबू जगजीवन राम यांनी पाच लाखांची मदत केली. दिल्लीमध्ये बाबासाहेबांचे पार्थिव हे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळच्या विमानाने पार्थिव मुंबईत आणण्यात आले. बाबासाहेबांचे अंत्यसंस्कार मुंबईत होणार होते आणि राज्यातील लाखो अनुयायी या ठिकाणी मिळेल, त्या वाहनाने धाव घेतली होती. बाबासाहेब यांचे अंत्यसंस्कार मुंबईत कुठे करायचे? हा प्रश्न बाबासाहेब यांच्या निकटवर्तीयांच्या समोर उभा राहिला होता. त्यानंतर बाबासाहेबांच्या अंत्यसंस्कार समुद्राच्या किनारी झाले पाहिजे, असे ठरविण्यात आले. त्यानंतर चैत्यभूमी या जागेची निवड करण्यात आली आणि अंत्यसंस्कारासाठीच्या जागेची समस्या सोडवली. अंत्यसंस्कारापूर्वी लाख अस्पृश्यांनी बाबासाहेबांच्या चितेच्या साक्षीने धर्मांतर केले. त्यानंतर चितेला अग्नी दिला. या जागेवरच वास्तु उभारण्याचा संकल्प बाबासाहेब यांचे चिरंजीव यशवंत आंबेडकर यांनी केला. यासाठी एका संस्थेची स्थापना करण्यात आली. निधी गोळा करण्यासाठी यशवंत यांनी भारतभ्रमण केले. यासाठी एक विशेष रथ तयार करण्यात आला होता. एक वास्तू बांधण्याएवढा निधी गोळा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चैत्यभूमी परिसरात वास्तू बांधण्याचे ठरवले. त्यानुसार एक वास्तू बांधून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या वास्तूत ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर एकवटतात. आज हे ठिकाण ऊर्जेचे सूत्र समजले जाते.
चैत्यभूमीच्या आतील रचना -
एक लहान घुमट असे चैत्यभूमीचे रूप आहे. हे दालन जमिनीवर आणि तळमजल्यात विभागले आहे. चौरस आकाराच्या संरचनेत एक दीड मीटर उंचीची वर्तुळाकार भिंत आहे. वर्तुळामध्ये संगमरवरी फरशीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे. वर्तुळाकार भिंतीत दोन दरवाजे आहेत. तळमजल्यावर एक स्तूप आहे आणि तेथे भिक्खूंसाठी विश्रांतीची जागा आहे. चैत्यभूमीचे मुख्य प्रवेशद्वार ही सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती असून आतमध्ये अशोक स्तंभाची प्रतिकृती बनविली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिकेला साडे २१ लाख रुपये खर्च आला. ११ सप्टेंबर २०१९ रोजी या भीमज्योतीचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - Omicron In Maharashtra: नायझेरीयावरून आलेल्या कुटुंबाला ओमायक्रॉनचा संसर्ग; राज्यात रुग्णांची संख्या 9 वर