मुंबई - शहरात बोरिवली परिसरातील उच्चभ्रू सोसायटीमधील रहिवाशांसाठी त्या परिसरात गार्डनची सोय करण्यात आली आहे. मात्र, येथील रहिवाशी एका वेगळ्याच कारणाने त्रस्त झाले होते. या गार्डनमध्ये येऊन अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून बोरवली पश्चिम येथील जॉगर्स पार्कजवळ सोसायटीने थेट रस्त्यावर 'नो किसिंग झोन' अशा आशयाच्या सूचना रंगवल्या आहेत. त्यामुळे या सूचना आता बोरिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
रस्त्यावरच लिहिली नो किंसिंग झोनची सूचना-
बागेच्या परिसरात आणि त्या शेजारच्या रस्त्यावर सुरू असलेल्या या अश्लील चाळ्यांमुळे येथील नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी रहिवाशांनी थेट या बागेच्या मार्गावर नो किसिंग झोन अशा आशयाचे फलक लावून टाकले. तसेच तेथील रस्त्यावरही ठळक अक्षरात नो किसिंग झोन लिहण्यात आले आहे. हे फलक लावल्याने आता या ठिकाणी जोडपी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी होत असलेल्या अश्लील चाळ्याला लगाम लावण्यासाठी सध्या लावण्यात आलेले हे नो किसिंग झोनचे फलक चर्चेचा विषय बनला आहे.