मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी रोज हजारोंच्या संख्येने वाढत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा दर 14 दिवसांचा आहे. मात्र कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत हा दर 21 दिवसांवर आणण्यात यश आले आहे. धारावीत कोरोना रुग्ण आढळून आल्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन, क्वारंटाईन आणि रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारामुळे रुग्ण वाढीचा दर 21 दिवसांवर आणण्यात यश आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.
धारावीत 24 तासांत 38 नवे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने धारावीतील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 621वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत धारावीत 60 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आठवडाभरातील सरासरी रुग्णवाढीचा दर 6.61 असताना दाटीवाटीच्या वरळी-लोअर परळचा समावेश असलेल्या ‘जी-साऊथ’मध्ये 3.5 टक्के, धारावीचा समावेश असलेल्या जी-नॉर्थमध्ये 5 टक्के राहिला आहे. वरळी-कोळीवाडा, धारावीसारख्या भागात वेगाने हायरिस्क काँटॅक्ट शोधून आतापर्यंत 48 हजारांवर संशयितांना कोरोना केअर सेंटर -1मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ठराविक दिवस लक्षणे दिसली नाहीत तर, त्यांना घरी सोडण्यात येत असून पॉझिटिव्ह निघाल्यास सीसीसी -2 किंवा पालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार्या उपाययोजना सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांचे सहकार्य यामुळेच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यास मदत होत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
धारावीत आठवडाभरापूर्वी 50हून अधिक रोज रुग्ण सापडत होते. मात्र ही संख्या आठवडाभरापासून कमी झाली आहे. 25 ते 40च्या दरम्यान रुग्णांची नोंद होत आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 42 टक्के -
धारावीत रुग्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण 42 टक्के एवढे आहे. सोमवारपर्यंत येथे 599 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नागरिकांची तपासणी करून उपचार यंत्रणा त्वरीत राबवली जात असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तीन दिवसांत एकही मृत्यू नाही -
गेल्या 24 तासांत 38 नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने धारावीतील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 621वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला आहे. दादर, माहीम व धारावीत गेल्या तीन दिवसांत एकही मृत्यू झाला नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.