मुंबई - मुंबईच्या भांडुप येथील ड्रीम्स मॉलला गुरुवारी रात्री आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हॉस्पिटल होते. या रुग्णालयातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. मॉलमध्ये रुग्णालय हे मी पहिल्यांदाच बघितले आहे. मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत.
आगीच्या चौकशीचे आदेश -
मुंबईच्या ड्रीम्स मॉलला रात्री आग लागली. या आगीनंतर रात्री महापौरांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पुन्हा घटनास्थळाला भेट दिली. या भेटीनंतर महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना, आगीची घटना समजल्यानंतर काल मध्यरात्री या ठिकाणी भेट देऊन मॉलमध्ये असलेल्या सनराईज रुग्णालयाबाबत विचारणा करून संबंधित कोविड रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये तात्काळ हलविण्याचे निर्देश दिले. मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून याबाबत चौकशीचे आदेश दिल्याचे महापौरांनी सांगितले.
संबंधित सनराईज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्यानंतर हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते. आग ही मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागल्यानंतर ती जोमाने वाढून वर कोविड सेंटरपर्यंत जाऊन पसरली. त्यातून ही दुर्घटना घडली असून या ठिकाणी अग्नीसुरक्षेची पुरेशी काळजी घेण्यात आली होती का ? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
हे ही वाचा - बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बघा खासदार नवनीत राणा यांची खास मुलाखत
दोषींवर कारवाई करणार -
यापूर्वी मुंबईमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच सर्व कोविड सेंटरमधील फायर ऑडिट तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. या आगीचा दोन दिवसात संपूर्ण अहवाल आल्यानंतरच यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.