मुंबई - मुकेश अंबानी यांच्या निवासस्थान परिसरात स्फोटके ठेवल्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. एनआयए आणि एटीएसमार्फत सुरु असलेल्या या चौकशीत बाधा येऊ नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
चौकशीमध्ये अक्षम्य चुका-
मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. देशमुख यांनी याबाबत खुलासा केला. या प्रशासकीय बदल्या नाहीत. ही एक कारवाई आहे. चौकशीमध्ये अक्षम्य चुका समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणाच्या चौकशीत बाधा येऊ नये, निपक्षपाती चौकशी व्हावी, यासाठी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. घटनेतील प्रत्येक दोषींवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले.
हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त-
सचिन वाझे प्रकरणावरून चांगलेच अडचणीत आलेल्या ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.
रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझे या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांच्या अंगाशी आल्याचं स्पष्ट झालेल आहे. गृहखात्याकडून मुंबई पोलिस आयुक्तपदावरून परमबीर सिंग यांना हटविण्यात आले असून सध्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी वर्णी लागली आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रजनी सिंग सेठ यांना पाठवण्यात आलेला आहे.
हेही वाचा-'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका