मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातून रसद पुरवली असा आरोप पुण्याच्या सभेतून केला होता. त्यानंतर आज मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक फोटो ट्विट करून ती रसद महाराष्ट्रातून शरद पवार यांनी पुरवली असा आरोप केला. यावर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच, बृजभूषण सिंह हेदेखील त्यांच्या राज्यात कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्या वेळच्या कुस्तीच्या कार्यक्रमाचा तो फोटो आहे. त्यामुळे त्या फोटोचा राजकीय संबंध लावण्याचा कोणतेही कारण नाही.
मुख्य प्रश्नांकडे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : मंदिर आणि मशिदिचा प्रश्न उपस्थित करत देशात आणि राज्यात एकप्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे. मात्र, या गोष्टींना जास्त महत्त्व देता कामा नये. शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा वाद समोर आणून अस्थिर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात याबाबत कोणी कृती केल्यास पोलीस त्याची गंभीर दखल घेतील. महत्त्वाच्या मुद्द्यावर कोणाला चर्चा करायची नसून, केवळ आरोप-प्रत्यारोपांमध्ये विरोधकांना रस आहे. जेणेकरून मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष जाणार नाही, असा प्रयत्न विरोधकांचा असल्याचे गृहमंत्री यावेळी म्हणाले.
ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार आग्रही : ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे सातत्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष घालत आहेत. निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या आरक्षणाबाबतचा कार्यक्रम जाहीर केला असला, तरी निवडणुकीपूर्वी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण नियमित व्हावे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करीत आहे. आरक्षणासाठी लागणारा इम्पेरियल डेटा सर्वोच्च न्यायालयात सादर करून, ज्याप्रमाणे मध्य प्रदेशबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठीदेखील निर्णय दिला जाईल.
निवडणूकीआधी ओबीसी आरक्षण लागू होईल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मलिक निर्दोष सुटतील असा विश्वास : अनेक वर्षे आधीचा व्यवहार बाहेर काढून नवाब मलिक यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. या व्यवहारात ईडीला काय मिळालं? हे त्यांच्या तपासाचा भाग आहे. मात्र, या सर्व प्रकरणातून नवाब मलिक निर्दोष मुक्त होतील, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला
मुख्यमंत्र्यांवर सोमय्यांचे आरोप गमतीशीर : भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप लावले. पोलिसांना देण्यात आलेले बुलेटप्रूफ जॅकेट मधे घोटाळा करणाऱ्या कंपनीसोबत ठाकरे कुटुंबाचे संबंध आहेत. या जॅकेटमुळे मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये उच्च पोलिस अधिकारी हेमंत करकरेंसहीत इतर पोलिस शहीद झाले असे म्हणले होते. मात्र, सोमय्या यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर केलेला आरोप हा गमतीशीर आहे. त्यांनी कशाचाही संबंध कशाशीही जोडला आहे. सोमय्या यांना ही माहिती कुठून मिळते, हा एक सवाल आहे. मात्र, या गोष्टीत कोणतेही तथ्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंह आणि शरद पवारांची युती.. संदीप देशपांडेंचा आरोप