मुंबई - कार्डिया क्रूझवर झालेल्या धाडीमध्ये एनसीबी (अमली पदार्थविरोधी पथकाने) केलेल्या कारवाईत मुख्य पंच प्रभाकर साईल याने पोलिसांकडे सुरक्षा मागितली आहे. आपल्या जिवाला धोका असून आपल्याला पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर प्रभाकर साईलला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. कार्डिया क्रूझवर केलेल्या धाडीनंतर याबाबत एक-एक नवीन खुलासे समोर येत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाली असून, याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचेही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
'मलिक यांच्यासोबत अद्याप चर्चा नाही'
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी वेगवेगळे आरोप लावले आहेत. मात्र अद्याप नवाब मलिक यांच्यासोबत या आरोपांबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या नवाब मलिक नांदेडला असून ते मुंबईला परत आल्यानंतर याबाबत चर्चा केली जाईल, असे संकेतही गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
'राज्य सरकार विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेनेचा वापर'
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर राज्य सरकार तसेच राजकीय व्यक्तींना वेटीस धरण्यासाठी केला जात आहे. याआधी कधीही अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग केला गेला नव्हता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकार, तसेच राजकीय व्यक्तींना वेटीस धरण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग केला जात असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा - आमची लढाई एनसीबीशी नाही तर चुकीचं काम करणाऱ्यांविरोधात - नवाब मलिक