मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्णब गोस्वामींना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू देण्यासंबंधी सूचना केली होती. याबाबत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सविस्तर पत्र देखील लिहिले. कोरोनाचे संक्रमण ध्यानी घेता अर्णबचे वकील आणि कुटुंबीय तुरुंग प्रशासनाच्या परवानगीने अर्णब यांच्याशी संपर्क साधू शकतात, असे राज्यपालांना सांगण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी अलिबाग येथील आर्किटेक अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या अमहत्येप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयाकडूनही अर्णबला दिलासा मिळलेला नाही. भाजपाकडून सध्या अर्णबचे समर्थन केले जात आहे. त्यातच आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्र्यांना फोन केला. याबाबात बोलताना राज्यपालांचा फोन आल्याचे मान्य करत, त्यांनी अर्णबला कुटुंबीय आणि वकिलांना भेटू द्या, अशी सूचना केल्याचे देशमुख म्हणाले. मात्र गेल्या चार महिन्यांत तुरुंगात कोरोना पसरू नये, यासाठी नातेवाईक आणि वकिलांच्या भेटी बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
या कालावधीत जेलमधील व्यक्तीला कुटुंबीय आणि वकिलांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यास परवानगी देण्यात आली आहे. अर्णबलाही त्यांचे कुटुंबीय आणि वकिलांशी संपर्क साधायचा असल्यास ते फोन द्वारे संपर्क साधू शकतात, असे देशमुख म्हणाले. मात्र फोनवरून संपर्क करताना त्याला तुरुंग प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे राज्यपालांना सांगण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच बोलण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली. राज्यपालांनी यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडे अर्णब गोस्वामी यांना केलेल्या अटकेवरून चिंता व्यक्त केली होती.
काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक या आर्किटेकने अर्णब गोस्वामींनी पैसे थकवल्याने 2018 साली आत्महत्या केली होती.यावेळी नाईक यांच्या आईनेही आत्महत्या केल्याचे समोर आले. नाईक यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये गोस्वामी यांचे नाव आहे. तसेच अन्य दोघांची नावंही आहेत. यानंतर तत्कालीन भाजपा सरकारच्या काळात हा खटला दाबला गेल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. आता हा खटला पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या अर्णब तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.