मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारतर्फे मोठा खुलासा करण्यात आला आहे. राजकीय पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, बदनामीसंदर्भात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्र सरकार कोरोनाविरोधात लढत असताना भारतीय जनता पक्षाने सतत सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून देवेंद्र फडणवीसांनी राज्य पोलीस दलाला देखील लक्ष्य केल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी केला आहे. बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा बदनामीचा डाव आखल्याची टीका अनिल देशमुखांनी केली.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सुधीर गुप्तांसह सात पॅनलीस्टने अहवाल दिला आहे. यामध्ये हा मृत्यू म्हणजे आत्महत्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच एम्स (AIIMS) आणि कूपर रुग्णालयाचा अहवाल देखील एकच असून यामध्ये देखील आत्महत्येचा उल्लेख आहे. तरीही भाजपाप्रणित लोक राज्य सरकारवर टीका करत असून त्यांचा पर्दाफाश करणारा रिपोर्ट समोर आल्याची माहिती देशमुख यांनी दिली. अमेरिकेची मिशिगन युनिव्हर्सिटीच्या अहवालाचा दाखला देत, त्यांनी हे सर्व भाजपाने केलेले षडयंत्र असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यासाठी काही माध्यमांचा देखील वापर करण्यात आल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी केला आहे. यामध्ये काही वाहिन्यांचा हात आहे, असे ते म्हणाले.
अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीत गेल्या चार महिन्यांपासून सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी भारतात सुरू असलेल्या मीडिया कॅम्पेनचा अभ्यास करण्यात आलाय. यासंदर्भात एक रिपोर्ट त्यांनी सादर केला. या रिपोर्टनुसार सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एका राजकीय पक्षाने काही वृत्तवाहिन्यांसोबत हे प्रकरण विनाकारण उचलले. भाजपाकडून करण्यात आलेल्या कॅम्पेनिंगमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र पोलिसांचा व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षं राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना गृहमंत्री म्हणून देखील पोलिसांचे नेतृत्व केले आहे. मात्र , सुशांतसिंह संदर्भात पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही, असे वक्तव्य करून त्यांनी राज्य पोलीस दलाचा अपमान केला. यासाठी फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही, असे अनिल देशमुख म्हणाले.