मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईत मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही सरकारी आस्थापनांसह सार्वजनिक ठिकाणी सुट्टी जाहीर झाली आहे. काही सरकारी विभागातील कर्मचारी कर्तव्यावर असल्याने त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. मुंबईतल्या दादर भागात महापालिकेचे सफाई कर्मचारी सकाळपासून सेवेत असल्याने ते कामगारही मतदानापासून वंचित राहतात की काय, असे चित्र आहे.
मुंबईतील महापालिकेच्या बाला या सफाई कर्मचाऱ्याने याविषयी माहिती दिली. दादर परिसरात कार्यरत असलेले बाला म्हणाले की, सकाळपासून आम्ही ड्युटीवर आहोत. आम्हाला दुपारी दीडनंतर सोडण्यात येणार आहे. मात्र, अनेक कर्मचारी मुंबईबाहेर पनवेल, वसई-विरार भागात राहतात. मुंबईतून दुपारी सुट्टी झाल्यानंतर मतदान केंद्रात पोहोचणे या कर्मचाऱ्यांसाठी फार अवघड होऊन जाते . त्यामुळे अनेकदा मतदानाचा हक्क बजावता येत नाही. सरकारने अर्धा दिवस किंवा शक्य झाल्यास पूर्ण दिवस सुट्टी दिल्यास आम्हाला आमचा हक्क बजावता येईल, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे निवडणूक आयोग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापनांना सुट्टी देण्याचे आदेश देतात. तर, दुसरीकडे सरकारी कर्मचारी आपला मतदानाचा हक्क बजावू शकत नाही. अशी विसंगती दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना मतदानाच्या दिवशी ड्युटीवरून अर्धा दिवस दिल्यास त्यांनाही आपला हक्क बजावता येईल.