मुंबई - शहरासह कोकणातील अनेक भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी ५ ऑगस्ट आणि त्या दरम्यानच्या पुढील 48 तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून रविवारी शालेय शिक्षण विभागाने मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
प्रशासनाकडून एका ट्वीटच्या माध्यमातून रविवारी सायंकाळी ही माहिती देण्यात आली. तर दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनीही राज्यात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टीने परिस्थिती गंभीर असेल, त्या ठिकाणी सर्वच शाळा महाविद्यालयांना आम्ही सुट्टी जाहीर केली असल्याचे सांगितले.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी परिसरात शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास, उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी सोमवारी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन देखील राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, या दरम्यान कोणत्याही अत्यावश्यक सेवा बंद राहणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शाळा, महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये वरिष्ठ महाविद्यालये आणि विद्यापीठांचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे यासंदर्भात विद्यापीठ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून लवकरच सुट्टीसाठीचे आदेश काढले जाणार असल्याचे सांगण्यात येते.