मुंबई: एचआयव्ही ओळखण्यासाठी स्व-चाचणी किटची स्वीकार्यता आणि व्यवहार्यता यांचे मूल्यांकन करण्यासाठी गेल्या आठवड्यात एका राष्ट्रीय अभ्यासाचे अनावरण करण्यात आले ज्याला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. (HIV self testing kit launch in India). त्यामुळे आता भारतात लवकरंच एचआयव्ही सेल्फ टेस्टिंग किट येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते या किट मुळे व्हायरसची चाचणी जलद गतीने होणार आहे आणि त्यामुळे एचआयव्ही बाधित लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ देखील होऊ शकते.
सेल्फ टेस्ट किटची आवश्यकता: कोणताही आजार दूर करण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करणे आणि त्याचा संसर्ग शोधणे आवश्यक आहे, यामुळेच आता एचआयव्ही सेल्फ टेस्ट किटची गरज भासू लागली आहे. भारतात अजूनही एड्स हा असा आजार आहे ज्याबद्दल कुटुंबात उघडपणे बोलले जात नाही, तसेच लोक त्याच्या तपासणीसाठी रुग्णालये किंवा दवाखान्यात जाण्यास संकोच करतात. ICMR म्हणजेच राष्ट्रीय एड्स संशोधन केंद्राने महाराष्ट्रातील नुकत्याच केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की केवळ महिला आणि पुरुषच नाही तर ट्रान्सजेंडर यांना सुद्धा एड्सबाबत भीती, संकोच आणि गैरसमज आहेत.
14 राज्य आणि 50 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण: 14 एचआयव्ही प्रादुर्भाव असलेल्या राज्यांमधील 50 जिल्ह्यांमध्ये केलेल्या या अभ्यासात जवळपास 93,500 जण सहभागी झाले होते. सर्वेक्षण केलेल्या लोकसंख्येच्या काही विभागांमध्ये स्व-चाचणी किटची एकूण स्वीकार्यता 88% आणि कमाल 97% इतकी होती. सुमारे 95% वापरकर्त्यांना टेस्टचा रिपोर्ट मिळवणे सोपे वाटले. तर जवळपास 70% लोकांनी सांगितले की ते अशा चाचणीसाठी पैसे देण्यास तयार आहेत.
कसं वापराल टेस्ट किट: हे सेल्फ टेस्ट किट वापरून एखाद्याला HIV टेस्ट करायची असल्यास स्वतःची लाळ किंवा रक्ताचे नमुने देणे गरजेचं आहे. नंतर जलद चाचणी किट वापरून एचआयव्ही चाचणी होते. याचे परिणाम 20 मिनिटांत उपलब्ध होणार आहेत. सध्या भारतात एचआयव्ही चाचणी प्रामुख्याने प्रयोगशाळेवर आधारित आहे. स्वयं-चाचणीमुळे एखाद्याला त्याच्या घरातच किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सहज चाचणी देता येईल.
डिसेंबरमध्ये भारतात लॉन्च: मिळालेल्या माहितीनुसार पहिले स्वयं-चाचणी किट डिसेंबर 2022 पर्यंत भारतात लाँच केले जाऊ शकते. एकूण सात किट भारतीय बाजारपेठेत उतरण्यासाठी शर्यतीत आहेत, ज्यात चार WHO पूर्व-पात्र आणि तीन स्वदेशी विकसित आहेत. जागतिक स्तरावर 97 देशांनी धोरण स्तरावर स्वयं-चाचणीचा अवलंब केला आहे, तर 52 देशांमध्ये 2016 मध्ये WHO ने त्याचा वापर मंजूर केल्यापासून वापरात आहे.