मुंबई - शहरात जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण देणारी घटना समोर आली आहे. नाना पाटेकरचा एक डायलॉग खूप प्रसिद्ध आहे 'ये खून मुसलमान का है या हिंदू का बताये किस का खून' ही अशाच प्रकारची ही घटना आहे. ब्रेन डेड हिंदू महिलेचे हृदय मुस्लीम तरुणाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले आहे. हृदय प्रत्यारोपणामुळे मुस्लीम तरुणाला नवीन जीवन मिळाले.
इम्युनो-डायग्नोस्टिक तंत्र -
या हृदय प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांनी एक अद्वितीय प्रकारचे इम्युनो-डायग्नोस्टिक तंत्र वापरले आहे. परळ येथील प्रसिद्ध ग्लोबल रुग्णालयात 41 वर्षी हिंदू महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अंतर्गत रक्तस्त्रावामुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर तिच्या कुटुंबाने अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या महिलेचे हृदय माहीम येथे राहणाऱ्या 31 वर्षीय फरीद फणसोपकर यांना उपयोगी आले.
तीन महिन्यांपासून सुरू होते उपचार -
जुलै महिन्यापासून रुग्णालयात फरीदवर उपचार सुरू होते. फरीद व्यवसायाने शिंपी असून माहिमचा रहिवासी आहे. फरीद डाव्या वेंट्रिक्युलर डिसफंक्शन तसेच डिलेटेड कार्डिओ मायोपॅथीने ग्रस्त होता. जुलैमध्येच डॉक्टरांनी त्याला हृदय प्रत्यारोपणासाठी सुचवले. त्याचे शरीर इतर अवयव स्वीकारण्यासाठी, त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी इम्युनो-डायग्नोस्टिक तंत्रांचा वापर केला गेला. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते असे रुग्णालयाचे हृदय शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितले.
'असा' घडला योगायोग -
फरीद याचे हृदयरोपण व्हावे यासाठी त्याच्या घरच्यांनी त्याचे नाव नोंदवले होते. योगायोग असा की, याच रुग्णालयात एका महिलेला ब्रेन डेड घोषित करण्यात आला होते. त्यांच्या नातेवाईकानी अवयव दान करण्याचा निर्णयही घेतला होता. डॉक्टरांनी या महिलेचे हृदय फरीदला देण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वी शस्त्रक्रियेदरम्यान त्या महिलेचे हृदय फरीदच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. फरीदच्या हृदय प्रत्यारोपणासाठी अवलंबलेल्या तंत्रामुळे फरीद 9 दिवसांत पूर्णपणे बरा झाला.
हेही वाचा - जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबई पालिकेकडून जनजागृती व भ्रमणध्वनी सर्वेक्षण