मुंबई - बहुचर्चित आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. याप्रकरणी सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. हा पर्यावरणासाठी गंभीर निर्णय असून याचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने केली आहे.
'आरे'ला वनजमीन घोषित करण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे प्रस्तावित वृक्षतोड होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या वृक्षतोडीचे गांभीर्य जनमाणसांना कळावे यासाठी मंडळाकडून यावर्षी १९१९ सालची मुंबई आणि मुंबईची सध्याची परिस्थिती, असा तुलनात्मक देखावा उभारण्यात आला होता. यामाध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा मंडळाचा उद्देश होता.
उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता आरेमधील २७०० झाडे तोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही नक्कीच चांगली गोष्ट नसल्याने या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी आगरिपाडा सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष अक्षय बिरवाडकर यांनी केली आहे.
हेही वाचा : आरे मेट्रो कारशेडच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या