मुंबई : बहुचर्चित येस बँक घोटाळा प्रकरणात (Yes Bank scam Case) केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) विभागाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. येस बँक घोटाळ्यातील आरोपी राणा कपूर यांच्यावरील खटल्याची सुनावणी आता एकल न्यायाधीशांच्या पीठासमोरच होणार आहे. राणा कपूर (Rana Kapoor Case) यांच्यावर खटला चालवण्याच्या मंजुरीला आव्हान देणारी याचिका कपूर यांनी दाखल केली होती. हे प्रकरण दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याची मागणी सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली होती. सीबीआयची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली (High Court Rejects CBIs Demand) आहे.
१४ जानेवारीला पुढील सुनावणी
येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्या याचिकेवर एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच पुढे सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायमूर्ती एस एस शिंदे ( Justice S S Shinde ) यांच्या खंडपीठाने ही मागणी अमान्य केली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत राणा कपूरवर खटला चालवण्याच्या मंजुरीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात ( Bombay High Court ) येस बँकेचे सह-संस्थापक राणाकपूर यांनी दाखल केली होती. ह्या याचिकेवर न्यायाधीश एस एस शिंदे यांच्या एकल न्यायाधीशाचं खंडपीठ सुनावणी करत होते. या याचिकेवर आता न्यायमूर्ती एस एस शिंदे 14 जानेवारीला पुढील सुनावणी करतील.
काय आहे प्रकरण?
राणा कपूर आणि गौतम थापर ( Gautam Thapar ) यांच्यासह राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू कपूर ( Bindu Kapoor ) यांनी ते संचालक असलेल्या कंपनीमार्फत केवळ 378 कोटी देऊन बेकायदेशीररीत्या बाजारभावापेक्षा कमी किंमतीत बंगला विकत घेतला. त्याविरोधात सीबीआयनं त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या 420, 120, आणि पीसीएच्या कलम 7,11 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही मालमत्ता थापर यांची मालकी असलेल्या 'अवंथा' रियल्टीची ( Avantha Realty ) होती. राणा कपूर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून 1 हाजर 900 कोटी रुपयांचं कर्ज मिळवून देण्यासाठी हा बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप सीबीआयनं केला आहे.