मुंबई - उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पहिल्याच पावसाच्या मुसळधार सरींनी दिलासा दिला. मुंबईत सोमवारी साडेनऊपासून ढगांच्या गडगडासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. संध्याकाळच्या सुमारास आकाशात काळ्या ढगांची दाटी झाल्यानंतर मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली.
अचानक पाऊस कोसळल्याने कामावरुन घरी निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले. छत्री किंवा रेनकोट सोबत नसल्यामुळे अनेकांना भिजतच घर गाठावे लागले. मुंबईत मागच्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात उकाडा बराच वाढला होता.
दरम्यान मंगळवारी ११ जून रोजी मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. वेधशाळांच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असून त्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबई व किनारी भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाले की, त्याचा परिणामी किमाऱ्यालगतच्या प्रदेशांमध्ये पाऊस सुरू होतो.
कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता जास्त असेल तर वादळी वाऱ्यांसह पाऊस येतो, जी स्थिती सध्या दिसत आहे. हवामान विभागाने अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याचे व त्यांची तीव्रता वाढत असल्याचे म्हटले आहे. परिणामी ११ व १२ जून रोजी मुंबईत पाऊस कोसळण्याचा व कदाचित वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.