मुंबई - शहर व उपनगरात मंगळवार रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने सखल भागात पाणी साचले आहे. पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा ठप्प झाली असून मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेली बेस्ट मुंबईकरांसाठी धावून आली आहे. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्यात अडकून बेस्टच्या तब्बल ३० गाड्या बंद पडल्या आहेत. त्यापैकी २३ गाड्या दुरुस्त करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मंगळवार रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने शहरात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. सायन कुर्ला, चुनभट्टी, मस्जिद स्थानकादरम्यान पाणी साचल्याने रेल्वे सीएसएमटी ठाणे आणि सीएसएमटी वाशी दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दादर हिंदमाता, किंग सर्कल, सायन रोड नंबर २४, मालाड सबवे, वांद्रे टॉकीज, शास्त्री नगर गोरेगाव, अंधेरी सबवे, भेंडीबाजार, गोल देऊळ, नाना चौक, मुंबई सेंट्रल जंक्शन, बावला कंपाऊंड, जे जे जंक्शन, काळाचौकी, सारथी बार, वरळी सी फेस आदी भागात पाणी साचल्याने या मार्गावरील रस्ते आणि बेस्ट वाहतूक वळवण्यात आली आहे.
मुंबईत रस्त्यावर पाणी साचल्याने त्यात तब्बल ३० बस अडकल्या होत्या. पाणी ओसरल्यावर त्यापैकी दिवभरात २३ बसेस दुरुस्त करण्यात आल्या. मात्र ७ बसेस पाण्यामध्येच असल्याने त्या बसेस पर्यंत पोहचता आले नसल्याने दुरुस्त करता आलेल्या नाहीत. दरम्यान रेल्वे सेवा बंद असताना रस्ते वाहतूकही कोलमडली होती. वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्याने प्रवाशांना व विशेष करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना त्रास सहन करत आपल्या नियोजित ठिकाणी पोहचावे लागले.