मुंबई - शहरातील विविध भागांमध्ये गुरुवारपासून जोरदार पाऊस बरसतोय. या पावसामुळे विविध भागात पाणी साचलं. मुंबईकरांना अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तसेच काही वेळ उपनगरीय रेल्वेसेवाही विस्कळीत झाली. हा सर्व मनस्ताप सहन केल्यानंतर आता मुंबई आणि कोकणासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. (mumbai thane raigad and palghar districts are likely to receive heavy rains in next 3 4 hours imd forecast)
हवामान खात्याची माहिती - भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे, मुंबई, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात 11 जुलै रोजी मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे (Red Alert in Pune). पुणे जिल्ह्यातील घाट विभागातील डोंगरमाथ्यावर सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
प्रशासनाचे आवाहन - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात दरड कोसळल्याने पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोंगरमाथ्यावर जाणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केलं आहे.
मुंबईत ऑरेंज रेड जारी - यासोबतच पालघर, ठाणे आणि मुंबईतही आज मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईत ऑरेंज रेड जारी करण्यात आला आहे. तर, पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून तिथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता - मुंबईसह कोकणात येत्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. तसंच पुढील चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबई महापालिकेला अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.