मुंबई - आज मुंबई, ठाणे आणि कोकण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पावसाचा जोर वाढेल.
मागील 24 तासांत मुंबईत सतंतधार सुरू आहे. ढगाळ वातावरण असून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस असेल. 45 ते 55 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. समुदात संध्याकाळी 7 वाजून 24 मिनिटांनी भरती असून ती 3.1 मीटर असेल. मागील 24 तासात कुलाबा येथे 21.6 मिमी तर सांताक्रूझ 41.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. येत्या तीन, चार दिवस हा पावसाचा जोर कायम असेल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरापासून बिहारपर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरावर वायव्य आणि पश्चिम-मध्य भागात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ वातावरणाच्या खालच्या स्तरात चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि गोव्यात पुढील 72 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुजरात राज्य, पूर्व राजस्थान आणि मध्य भारतातील बऱ्याच भागांमध्ये पुढील 48 तासात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
गुजरात राज्य आणि पूर्व राजस्थानात तुरळक भागात अतिजास्त मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. 15 ऑगस्टला गुजरात, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग ताशी 45-55 किमी असणार. या काळात या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील हवामानाचा अंदाज -
१४ ऑगस्ट : कोकण गोवा बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
१५-१६ ऑगस्टः कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
इशारा:
१४ ऑगस्ट-
कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१५ ऑगस्ट-
कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
१६ ऑगस्ट-
कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र- गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.