मुंबई - ओडिशा येथील किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून पुन्हा मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सक्रिय झाला आहे. यामुळे सार्वजनिक गणपती बघण्यासाठी कुठे जात असाल तर विचार करा, कारण मुंबईत तसेच कोकणात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
मागील 24 तासांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाची मुसळधार आणि संततधार सुरूच आहे. पावसाची सर्वात जास्त नोंद ठाण्यामध्ये करण्यात आली. गेल्या २४ तासांत १९० मिलीमीटर पाऊस ठाण्यात झाला आहे. तर रत्नागिरीत 136 मिमी, अलिबाग 133 मिमी, सांताक्रुझ 131 मिमी, महाबळेश्वर 41 मिमी, सोलापूर 35 मिमी तर नागपुरात 30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.