मुंबई - मशीदीवरील भोंगे न हटवल्यास मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केले होते. राज ठाकरेंनी दिलेला अल्टीमेटम संपला असून आजपासून मनसे कार्यकर्ते राज्यभर भोंग्याविरोधात आंदोलन करत आहेत. हनुमान चालीसा प्रकरणावरुन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, त्यामुळे राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
काय आहे हनुमान चालीसा प्रकरण - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेऊन मशीदीवर लावण्यात आलेले भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचेही त्यांनी बजावले होते. मात्र 3 तारखेनंतर भोंगे न हटवल्यास मनसे मशीदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करेल असा अल्टीमेटम राज ठाकरेंनी सरकारला दिला होता.
ईदमुळे ढकलली आंदोलनाची तारीख पुढे - राज ठाकरेंनी औरंगाबादच्या विराट सभेत मशीदीवरील भोंगे काडण्याचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. मात्र मुस्लीम बांधवांचा ईद हा सण 3 तारखेला असल्याने कोणाच्या सणात विघ्न आणायचे नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांनी सभेत जाहीर केलेली 3 तारीख पुढे ढकलून 4 तारखेपासून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.
भोंगे हा धार्मीक नव्हे, सामाजिक विषय - मशीदीवरील भोंग्यामुळे नागरिकांना त्रास होतो. ध्वनीप्रदुषणही होते. त्यामुळे फक्त मशीदीवरीलच नव्हे, तर मंदिरावरील भोंगेही काढण्यात यावेत ,अशी भूमीका राज ठाकरे यांनी घेतली. भोंगे हा धार्मीक नव्हे, तर सामाजिक विषय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.