मुंबई - सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांच्या विरोधात माफीचा साक्षीदार होण्यासाठी ईडीकडून परवानगी दिली आहे. सचिन वाझे यांनी दाखल केलेल्या अर्जावर ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात उत्तर सादर केले आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय कोर्टाचा असल्याने आता या अर्जाला कोर्ट काय निर्णय देते यावर 3 ऑगस्ट रोजी निर्णय येणार आहे.
कुंदन शिंदे हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हेगार - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने आर्थिक व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक करण्यात आले होते. सध्या अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख व त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण व भ्रष्टाचाराप्रकरणी आरोपी आहेत.
काही ठिकाणी त्याचा जबाब अगदी महत्त्वाचा - सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातही सचिन वाझेला विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार केला आहे. सीबीआयनेही त्याला सारखीच अट घातली आहे. गुन्ह्याबाबत असलेली सर्व माहिती व प्रत्येक आरोपीची त्यातील भूमिकेविषयी स्पष्ट व खरी माहिती देण्याची अट वाझेला घालण्यात आली आहे. तपासादरम्यान जमा केलेल्या मौखिक व कागदोपत्री पुरावे व वाझे याने दिलेला जबाब हे एकमेकांची पुष्टी करत आहेत. काही ठिकाणी त्याचा जबाब अगदी महत्त्वाचा आहे. वाझेने देशमुखांचा साथीदार म्हणून काम केले आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असे ईडीने वाझेच्या अर्जावर उत्तर देताना म्हटले आहे.
संबंधित गुन्ह्यांत आरोपीची भूमिका - वसुलीद्वारे आलेल्या पैशांवर देखरेख व ते देशमुखांकडे सोपवण्याची पालांडे व शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती वाझेला होती. देशमुख 100 कोटी वसुलीच्या कटातील मुख्य सूत्रधार आहेत, असे ईडीने उत्तरात म्हटले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेने 9 जून रोजी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यावर उत्तर दाखल केले. विशेष न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. संबंधित गुन्ह्यांत आरोपीची भूमिका व अन्य आरोपींची भूमिका आरोपीने स्पष्ट करण्याच्या अटीवरच त्याचा माफीचा साक्षीदार बनण्याचा अर्ज मंजूर करण्यास तपास यंत्रणेला हरकत नाही.
काय आहे प्रकरण? - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहेत.
हेही वाचा - Rajinikanth : अभिनेता रजनीकांतचा आयकर विभागाकडून गौरव.. तामिळनाडूत भरला सर्वाधिक कर