मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणात ( Bully Bai App Case ) मुंबई पोलिसांच्या सायबर पथकाने ( Mumbai Police Cyber Squad ) आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे. या सर्व आरोपींकडून बांद्रा कोर्टामध्ये ( Bandra Court ) जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. आज (सोमवार) श्वेता सिंग, मयंक रावत आणि विशाल कुमार झा या आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला असून उद्या (मंगळवारी) मुंबई पोलिसांकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. या प्रकरणातील उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी असून बंगळुरु येथून अटक करण्यात आलेला एक आरोपी आहे. महिला आरोपी श्वेता सिंगने चौकशीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून मारहाण करण्याचा आरोप देखील मागील सुनावणी वेळी न्यायालयासमोर करण्यात आला होता. या प्रकाराची चौकशी करण्याकरिता न्यायालयाने पोलिसांना आदेश देखील दिले होते.
- तिन्ही आरोपींची कलिनातील कोविड सेंटर रवानगी
बुली बाई अॅप प्रकरणातील तिन्ही आरोपींना बांद्रा कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी देखील या प्रकरणातील दोन आरोपींना कोरोनाची लागण झाल्यामुळे यांच्यावर कलिनातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. आरोपी विशाल कुमार झा याला 10 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती, तर या प्रकरणातील दुसरा आरोपी मयंक रावल काल कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या आरोपींना कलिनातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील महिला आरोपी श्वेता सिंगला कलिनातील कोविड सेंटरमध्ये होम आयसोलेशन ठेवण्यात आलेले आहे. या ठिकाणी होम आयसोलेशनचा वेळ संपल्यानंतर या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे.
- काय आहे बुली बाई ॲप?
मुस्लिम महिलांचा लिलाव करणारे एक अॅप सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याच अॅपचे नाव आहे बुली बाई अॅप. या अॅपवर कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट करुन त्यांना अपमानित केले जात होते. या अॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. असा आरोप आहे की, हे बुली बाई अॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट करत होते. यानंतर लोकांना या मुस्लिम महिलांच्या लिलावासाठी प्रोत्साहित केले जात होते.
हेही वाचा - Bully Bai app case : बुली बाई ॲप प्रकरणातील आरोपी विशाल कुमार झा कडून जामीनासाठी अर्ज