मुंबई - राज्याच्या आरोग्य सेवा भरतीत दलाल आणि एजेंट्सचा सुळसुळाट सुरू आहे. परीक्षाविना भरती करण्याचा घाट त्यांच्याकडून घातला जात असून यासाठी पंधरा लाखापर्यंत बोली लावण्यात आल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. या प्रकरणाची संभाषण क्लिप त्यांनी व्हायरल केली असून त्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शेंडगे यांनी केली. तसेच राज्य सरकारच्या कार्यपध्दतीवरही त्यांनी सडकून टीका केली. राज्य सरकारकडून संबंधितांवर आता काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा -...तर भाजपचे अंगवस्त्र म्हणूनच राहावे लागेल, शिवसेनेचा असदुद्दीन ओवेसींवर निशाणा
झारीतील शुक्राचार्य कोण ?
आरोग्य सेवा भरती प्रकरण धक्कादायक आहे. फार मोठा भ्रष्टाचार यात झाल्याची शक्यता आहे. ऑडिओ क्लिपमध्ये अमरावती जिल्ह्याचा उल्लेख आहे. मात्र याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे. क्लिपमध्ये न्यासा कंपनीचा उल्लेख आहे. न्यासा कंपनीचा मालक 84 दिवस तुरुंगात राहून आलेला आहे. काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला कंत्राट देण्यात आले, काय चाललंय नेमकं? या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली. तसेच समाजातील सर्व घटकांची मुले या परीक्षेची तयारी करत होते. या प्रकरणात झारीतील शुक्राचार्य कोण हे समोर आले पाहिजे, असेही शेंडगे म्हणाले.
हे ही वाचा -किसान मोर्चाचा राज्य सरकारला धसका, मुख्यमंत्र्यांनी बोलावली नुकसान भरपाईसाठी बैठक
काय आहे ऑडिओ क्लिप मध्ये -
भरतीसाठी एजंटमार्फत पंधरा लाख मागितले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्लास डी साठी सहा, क्लास बी साठी 13 लाख मागितल्यात येत असल्याचे ऑडिओ क्लिपमधून समजते. तसेच काम शंभर टक्के होणार, अशी एजंटकडून लोकांना बतावणी केली जात आहे. काम होण्यापूर्वी 50 टक्के आणि 50 टक्के नंतर देण्याचा आग्रह केला जातो आहे. तर कामापूर्वी 50 टक्के जास्त असून थोडे पैसे कमी करण्याची विनंती दलालाकडून केल्याचे ऐकायला मिळते.