मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्याने निर्बंध हटवण्यात आले. मात्र, आता पुन्हा कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. त्यातच पुण्यात बीए व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. गेले दोन वर्षे कोरोनाच्या विविध व्हेरियंटला रोखण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे. आताही नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क आणि सज्ज झाला आहे.
ओमायक्रॉनच्या नवीन व्हेरियंटचे रुग्ण - राज्यात गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने मुंबईसह राज्यातील निर्बंध उठवण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढू लागली असतानाच पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात ओमायक्रॉनच्या BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट आढळून आले आहेत. इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरनेही याची पुष्टी केली आहे. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या दोन्ही व्हेरिएंटच्या सातही रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी ( Corona New Variant Patient Discharge Pune ) देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope on Corona New Variant ) यांनी दिली.
मुंबई महापालिका सज्ज - राज्यात ओमायक्रॉनच्या (Omicron ) BA.4 व्हेरियंटचे चार तर BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आल्याने मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. या व्हेरियंटचा प्रसार वेगाने होतो. मात्र, रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे. ओमायक्रोनमुळे तिसरी लाट आली होती. तिसऱ्या लाटेवर मात केली आहे. यामुळे या व्हेरियंटसाठी वेगळी काही तयारी करावी लागणार नाही. तिसऱ्या लाटेत जी यंत्रणा होती ती आजही आहे. यामुळे ओमायक्रॉनच्या या नवीन व्हेरियंटला रोखण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. दरम्यान, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विमानतळावर चाचण्या केल्या जात आहेत. तसेच नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात वॉर्ड आणि खाटा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती गोमारे यांनी दिली.
हेही वाचा - रेल्वेची डिजिटल तिकीट बुकिंग सुसाट, ९.४५ टक्क्यांनी वाढली तिकिटांची विक्री