मुंबई - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला. त्यानंतर हे पद नेमके कोणाला भेटणार यासाठी शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काही दिग्गज नेत्यांमध्ये ही रस्सीखेच दिसते असून यासाठी पक्षामध्ये लॉबिंग देखील सुरू झाले आहे. मात्र, यामध्येच ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना दोन पत्र लिहिली असून, त्यापैकी एक पत्र हे आपल्याला वनमंत्री बनवले जावे या संदर्भाचे आहे. तर दुसऱ्या पत्रात निवडणुकीच्या काळात आपण शिवसेनेसाठी कसे काम केले, कोणती अभियान राबवली यासंदर्भातील माहिती दिली आहे.
तुमच्यासाठी मी माझी आमदारकी धोक्यात आणली-
संजय राठोड हे बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. येणाऱ्या काळात शिवसेनेला बंजारा समाजाची मोठी गरज लागणार आहे. याच समाजातून आपणही येत असल्याने आता वन मंत्री पद मला देण्यात यावे, असा उल्लेख आहे. मला काँग्रेसकडून सहज मंत्रीपद मिळाले असते. मात्र तुमच्यासाठी मी माझी आमदारकी धोक्यात आणली, असेही या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. निवडणुकी काळामध्ये शिवसेनेचे आमदार निवडून यावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन केलेल्या कामाचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. तसेच आपण भटक्या विमुक्त जाती, बंजारा समाज, ओबीसी समाज यांचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे याचा फायदा शिवसेनेला येणाऱ्या काळात होईल, असे बेरजेचे राजकीय गणित देखील त्यांनी आपल्या पत्रात मांडले आहे.
कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवसेनेसाठी काम केले
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. कोणतीही अपेक्षा न ठेवता राज्यभरात शिवसेनेसाठी काम केले याचीही आठवण त्यांनी या पत्रातून करून दिली. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा करण्यासाठी वेळही मागितलेली आहे.
हेही वाचा- मी क्राईम ब्रांचमधून मुक्त झालो - सचिन वझे
हेही वाचा- मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीमधून बाहेर काढणाऱ्याचा एटीएसने घेतला जवाब