मुंबई - काँग्रेसच्यावतीने देशात उद्भवलेल्या आर्थिक मंदी व महागाईच्या विरोधात आज (गुरुवारी) धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा आणि संजय निरुपम हे व त्यांचे कार्यकर्ते उपस्थित नव्हते. त्यामुळे अजूनही मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - अशोक चव्हाणांना विरोधक पकडणार कोंडीत...भोकरमधील भाजपच्या हालचाली वाढल्या
काँग्रेसमधील गटबाजी ही जगजाहीर आहे. मुंबई काँग्रेसचे दोन्ही माजी अध्यक्ष देवरा व निरुपम या दोघांनीही या आंदोलनात सहभागी होणे गरजेचे होते. मात्र, ते आले नाहीत. त्यामुळे मुंबई काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी सुरू केलेली मोहीम कुठेतरी अंतर्गत वादामुळे मागे पडत असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना या बद्दल विचारले असता ते म्हणाले, की आमच्यात कोणतीही गटबाजी नाही. मात्र, पक्षांतर्गत काही नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. पण काँग्रेसच्या विचारातूनच आम्ही पुढे चाललो आहोत आणि एकत्र आहोत, असे सांगितले. आंदोलनाच्या वेळी फक्त एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, भाई जगताप, मुंबईतील नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.