मुंबई : पोलीस दलातील बदल्यांच्या संदर्भातील प्रकरणात राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे. या मुद्द्यावर बुधवारी भाजपचे एक शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले. यावेळी ही मागणी करण्यात आल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस अस्तित्वहीन पक्ष
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस हा अस्तित्वहीन पक्ष आहे असा टोला यावेळी लगावला. काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही ते म्हणाले. काही आठवड्यांपासून राज्यात घडणाऱ्या घटना चिंताजनक असल्याचंही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचं मौन सर्वात चिंताजनक आणि घातक आहे. शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे असे फडणवीस म्हणाले.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलतं करावं
मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, याचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा ही आमची मागणी आहे. या संदर्भात १००हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे.