मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन केले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यावेळी उपस्थित होते.

कार्डद्वार पेमेंट करता येणार..
राज्यपालांनी आयुक्त नगराळे यांचेसोबत कॅन्टीन स्टोअरला भेट देऊन विविध उत्पादनांची तसेच गृहोपयोगी वस्तूंची माहिती घेतली. हे कॅन्टीन स्टोअर्स पूर्णपणे रोखविरहित असेल. ग्राहकांना केवळ कार्डद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल भरता येईल. येथील जवान तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना अन्नधान्य, किराणा सामान, इलेक्ट्रोनिक वस्तू तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तू माफक दरात उपलब्ध होईल, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

मुंबईत सहा कॅन्टीन शाखा..
राजभवन परिसरात सुरू करण्यात आलेले पोलीस कॅन्टीन मुंबईतील सहावे पोलीस कॅन्टीन आहे. नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव व कोळे कल्याण या ठिकाणी कॅन्टीनच्या शाखा आहेत. पहिल्या मुंबई पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या हस्ते दिनांक २६ जानेवारी २०१२ रोजी करण्यात आले होते.