मुंबई - टाटा मुंबई मॅरेथॉन दातृत्व पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. जानेवारी २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांसाठी निधी जमा करण्यात आला होता.जास्तीत जास्त निधी जमा करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तीक दात्यांना पुरस्कार देऊन गैरवण्यात आले. २९५ सामाजिक संस्थांनी या मॅरेथॉनच्या माध्यमातून ४५.९० कोटींचा निधी जमा केला होता.
यावेळी बोलतांना राज्यपाल म्हणाले की, जानेवारी महिन्यात या मॅरेथॉनचा माझ्या हस्ते शुभारंभ झाला होता. ५५ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने स्पर्धक असलेली ही मॅरेथॉन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय मॅरेथॉनच होती. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था आणि ज्यांनी वैयक्तिकरित्या मॅरेथॉनमार्फत विविध सामाजिक कामांसाठी सहकार्य केले. त्या सर्वांचे आभार मानतो.
दरम्यान श्रीमद राजचंद्र लव्ह अँड केअर या संस्थेने स्थापना झाल्यापासून आतापर्यंत 2.43 कोटी रुपये सामाजिक उपक्रमांसाठी दिले आहेत. त्याकरिता संस्थेचे दिवंगत धवल मेहता यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला.राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धवल मेहता यांच्या पत्नी अनुजा मेहता यांनी हा पुरस्कार स्वीकारला.