मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेतील वाद आता आणखी नवे वळण घेण्याचे संकेत देत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता यांना निमंत्रीत करून कंगना प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाला खतपाणी मिळण्याची चिन्ह आहेत.
मुंबईत येताच अभिनेत्री कंगना रनौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात एकेरीत उल्लेख असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर सेना विरुद्ध कंगना हा सामना आणखी पेटला आहे.
राज्यपाल कोशारी आणि महाविकास आघाडीतील वाद नवे नाहीत. मुख्यमंत्री पदाची शपथ देण्यापासून राज्यपाल कोश्यारींचे नाव चर्चेत राहिले. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या विषयापासून ते अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सरकार आणि राजभवनमध्ये यापूर्वी वाद निर्माण झाले होते. अभिनेत्री कंगना राणौतचे कार्यालय एक दिवसाची नोटीस देऊन पाडल्यानंतर राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सल्लागार अजॉय मेहता यांना काल राज्यपालांनी राजभवन वर बोलवून घेतले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यपाल या प्रकरणी केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहेत. कंगनाचा वाद एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे कंगनाची बाजू घेता घेता, भाजपची मात्र अडचण झाली आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांचा तपास आणि शिवसेनेवर तुटून पडत असतानाच, भाजपने कंगनाची बाजू घेतली. कंगनाने पीओके, बॉलिवूड माफिया, बाबर आणि पाकिस्तान सारखे शब्द मुंबई, मुंबई पोलीस तसेच मुख्यमंत्र्यांसाठी वापरल्याने, स्वत:ची बाजू सावरता सावरता भाजप नेत्यांची अडचण होत आहे.
राष्ट्रपती राजवटीची भाषा करून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना कंगनावरून भाजपवर निशाणा साधण्याचीही संधी मिळाली आहे. कारण याआधी राणेंनी ही राष्ट्रपती राजवटीची मागणी 2 महिन्याआधीच केली होती. सध्या शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबतचा संघर्ष पाहता यापुढे कंगना शांत राहण्याचे चित्र नाही. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या वादात उडी घेतल्याने प्रकरण चिघळणार असल्याचे दिसत आहे.