मुंबई - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारला सर्वोच्च न्यायालयात आलेले अपयश आणि राज्यभरात सुरू झालेला विरोध लक्षात घेऊन विरोधकांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. हिवाळी अधिवेशन हे केवळ दोनच दिवस चालणार असून पहिल्या दिवशी विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांच्या शोक प्रस्तावामुळे फार गदारोळ घालता आला नाही. तरीही सकाळी वंदे मातरम आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन झाल्यानंतर आणि कामकाजाला सुरुवात झाल्यांनतर विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि त्यासाठी निर्माण झालेला आक्रोशाचा मुद्दा रेटून धरला होता.
सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब -
दरेकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉरर्मेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या न्यायासाठी विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजीही झाली. मात्र या गोंधळातच सभापतींनी शोक प्रस्तावाच्या दिवसाची जाणीव करून देत विरोधकांना गप्प केले. मात्र त्यानंतरही विरोधकांनी वेलमध्ये येऊन गोंधळ घालणे सुरू ठेवण्यात सभापतीनी शासकीय विधेयके टेबल करुन घेतली आणि सभागृह पाच मिनिटांसाठी तहकूब केले.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का, वेगवान गोलंदाज झाला संघाबाहेर
शोक प्रस्तावाचे संकेत पाळत विरोधकांनी फार गोंधळ घातला नाही. यामुळे शोक प्रस्तावानंतर विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालेले असले तरी आज विरोधी पक्ष एकाच वेळी मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना मदत आणि सरकारकडून आणण्यात येणाऱ्या शक्ती कायद्यावर सरकारची गोची करण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचेही शिक्षक आणि पदवीधर आमदार शिक्षण विभागाने काढलेल्या शिपायांची पदे रद्द करण्याच्या जीआरवरून सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. यासाठीच आज विधीमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, अरुण लाड यांच्यासोबत शिक्षक आमदार बाळाराम पाटील आदींनी विधानसभेच्या पायऱ्यावर निदर्शने करून त्याची झलक दाखवली आहे. उद्या त्याचा मोठा धक्का सरकारला देण्याची तयारी केली आहे. यामुळे सरकारला आज मोठी कसरत करावी लागणार आहे.